Thursday, 28 May 2020

श्री गुरुदेव दत्त


नृसिंहवाडी येथे पुराण सुरु होते आणि विषय होता वैकुंठ भुवन . कार्तवीर्याची तक्रार घेऊन इंद्रादी देव भगवान विष्णूंकडे जातात तेव्हाचे वैकुंठाचे वर्णन दत्त माहात्म्यात आले आहे . थोरल्या महाराजांची रसाळ वाणी आपल्याला प्रत्यक्ष वैकुंठात असल्याचा प्रत्यय देते .
ते म्हणतात ,हे वैकुंठाचे स्थान म्हणजे आनंद भुवन असून अभागी मनुष्याला स्वप्नात देखील याचे स्मरण होणार नाही . सूर्यादिकांच्या प्रकाशाची गरज नसलेले ,रोग ,चिंता आणि क्लेश यांच्यापासून पूर्णतः मुक्त असलेले असे ते वैकुंठ आहे . शोक आणि मोह नसल्याने सर्वकाळ सुखावह आणि केवळ आनंद सर्वत्र भरला आहे अशा वैकुंठात कल्पवृक्षांची वने ,अमृताची सरोवरे असून कामधेनू येथे फिरत असतात . भव्य अशा भवनांना सुवर्णाच्या भिंती आणि त्याही रत्नजडित आहेत . यात लावलेली चित्रे हि जिवंत असल्याचा भास होतो आणि ह्या भगवान विष्णूंच्या निवासावर दोन द्वारपाल कायम उभे असतात . त्यांची नावे जय आणि विजय असून ते हि थेट भगवान विष्णूंसारखेच दिसतात . (चतुर्भुज ,घननीळ )
पुराण संपताच मी पुराणिक बुवांना गाठून प्रश्न केला ,थोरल्या महाराजांनी काय सुरेख वर्णन केले आहे वैकुंठाचे !! त्यांना हे सर्व वर्णन कसे माहीत असेल ?? त्यावर माझ्याकडे एक क्षुद्र कटाक्ष टाकून बुवा उत्तरले ,आचार्य ,अहो आपल्या घराचे वर्णन करायला संदर्भ लागत नाहीत ----- श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य

No comments:

Post a Comment