Sunday, 31 May 2020

श्री गुरुदेव दत्त


संकटे हि अनेक प्रकारची असतात . रोग भय ,शत्रू भय ,दारिद्र्य भय ,लोकापवाद अर्थात अपकीर्ती ,घरातील मतभेद वगैरे वगैरे . आणि हि सर्व संकटे आकस्मिक असतात . कधी कोणते दत्त म्हणून पुढे येईल ते केवळ दत्त महाराज जाणोत . कोणत्याही आगाऊ कल्पनेशिवाय समोर उभी टाकणारी हि संकटे आलेली असताना आप्त स्वकीय ,मित्रजन हे सर्व केवळ सल्ला देण्याखेरीज काही करत नाहीत . क्षणमात्र भय निवारण करून संकटातून कोण मदतीचा हात देणारे आहे ? दत्त महाराजांशिवाय कोणीही नित्य पाठीशी उभे राहत नाहीत .अर्थात याला श्रद्धेचे मापदंड अवश्य आहेत . श्रद्धा आहे तिथे प्रचिती आहेच .

सायंदेवाला गुरुमहाराज केवळ मदतीचा हात देऊन थांबले नाहीत तर म्हणाले ,जोवरी परतोनि येसी l असो आम्ही भरंवसीं l तू आलिया संतोषी l जाऊ मग येथोनिया ll अरे सायंदेवा ,तुला तो यवन काही करणार नाही आणि त्याला भेटून तू परत येई पर्यंत मी इथेच तुझी वाट पाहत असेंन .

सर्व माया त्यांचीच असल्याने पुढे काय काय होणार हे महाराजांना आधीच ठाऊक होते , त्याप्रमाणे सायंदेवाची भेट होताच यवनाला आपले अवयव कोणी छेदन करीत असल्याचा भ्रम उत्पन्न झाला . तूते पाचारिलें येथे कवणी l जावे त्वरित परतोनि ll अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत वस्त्रे भूषणे देऊन यवनाने सायंदेवाची पाठवणी केली .

या अध्यायात सायंदेवावर शत्रुभय किंवा मृत्युभय हे संकट जरी आले असले तरी श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराजांनी देखील आपले वचन किंवा सत्यसंध हे बिरुद कायम पाळलेले आहे . संधा म्हणजे प्रतिज्ञा . हि प्रतिज्ञा कोणती तर माझा जो भक्त आहे त्याचा उद्धार मी करणारच .

या अध्यायातील जोवरी परतोनि येसी l हि ओवी आपल्या पुढील जन्मासाठी देखील लागू होते . पुन्हा जन्म घेऊन आलो कि देखील दत्त महाराज संतोषने मान डोलावणार आहेतच . भक्त सान्निध्यासाठी अधीर असे हे दैवत आपल्या भक्तांना कायम  सोबत ठेवते . श्री गुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य

No comments:

Post a Comment