⚜️बोधकथा - दुसरी बाजू⚜️
ही प्राचीन काळातील गोष्ट आहे.
एक संत पहाटे समुद्र किनारी फेरफटका मारत होते. तेव्हा त्यांनी पाहिले की एक व्यक्ती महिलेच्या मांडीवर डोके ठेवून झोपला आहे आणि जवळच एक मदिराची बाटलीसुद्धा ठेवलेली होती.
संतांना वाटले की, हा किती पापी मनूष्य आहेत. सकाळीच मदिरा सेवन करून अशा अवस्थेत पडलेले आहेत. यांना एवढेसुद्धा भान नाही की एका सार्वजनिक ठिकाणी आपण कसे वागावे.
विचार करून संत पुढे निघाले. थोड पुढे गेल्यानंतर त्यांना एक व्यक्ती समुद्रात बुडत असल्याचे दिसले. संतांना त्याची मदत करायची होती पण त्यांना पोहता येत नव्हते. म्हणून हताश होऊन ते किनाऱ्यावरच उभे राहिले. तितक्यात महिलेच्या मांडिवर डोके ठेऊन झोपलेला व्यक्ती उठला आणि समुद्रात जाऊन बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले.
यावर संत विचारात पडले की आता या व्यक्तीला काय बोलू. याने तर एका माणसाचे प्राण वाचवून खूप मोठे पूण्य केले आहे. संत लगेच त्या व्यक्तीजवळ गेले आणि त्याला विचारले की आपण कोण आहात आणि येथे काय करताय?
यावर त्या व्यक्तीने सांगितले की, गुरूजी मी एक मच्छीमार आहे. बऱ्याच दिवसांपासून समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलो होतो, आज सकाळीच किनाऱ्यावर परत आलो आहे. महिलेकडे बघून तो म्हणाला की ती माझी आई आहे आणि मला घरी नेण्यासाठी आली आहे. घरात भांडी नसल्यामुळे तीने मदिराच्या बाटलीत पानी भरून आणले. लांबच्या प्रवासामुळे खूप थकलो होतो म्हणून किनाऱ्यावर आई च्या मांडीवर डोके ठेवून झोपलो होतो.
हे ऐकून संताच्या डोळ्यात पाणी आले, त्यांना वाटले मी अत्यंत वाईट विचार करत होतो. समोर पाहिले ते सत्य मानून त्यांच्याविषयी वाईट विचार करत होतो. पण वास्तविकता मात्र वेगळीच आहे.
कथेची शिकवण :
कोणतीही गोष्ट आपण बघत असतो ती दिसते तशी नसते, त्याची एक दूसरी बाजू असते. म्हणून कोणत्याही गोष्टीबाबत आपले मत व्यक्त करण्याआधी चांगला विचार करावा. सर्व पैलूंचा विचार केल्यानंतरच निष्कर्षापर्यंत जायला पाहिजे. नाहीतर आपल्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते....

No comments:
Post a Comment