द्विसाहस्री गुरुचरित्रात पहिल्या अध्यायात अर्थात चरितानुसंधानात दत्त महाराजांशी संवाद साधत नामधारकांनी केलेली स्तुती आहे . नामधारक म्हणताहेत अहो दत्त महाराज ,जगाचे राजे आपण आहात . सर्वजण राजाला ओळखतात पण राजा काही सर्वाना ओळखू शकत नाही असे आपण म्हणाल तर ते योग्य होणार नाही . अज्ञानी राजाच्या बाबतीत ते योग्य आहे पण आपण तर सर्वज्ञ आहात . तेव्हा माझी ओळख असू द्या .
ओळख असायला या जन्मी नाव आहे . पण मागील जन्मात समजा मनुष्य देहाव्यतिरिक्त कोणा जीवयोनीत जन्म झाला असल्यास दत्त महाराज कशी ओळख ठेवत असतील ? अनंत जन्मांचा इतिहास ते जाणत आहेत ,या जन्मीच्या नावाव्यतिरिक्त मागील अनेक जन्मीचे रूप गुण वर्णन दत्त महाराज लक्षात ठेऊन आहेत . ह्या जन्मी हा मनुष्य देह म्हणजे त्यांनी दिलेली एक संधी आहे . ह्या संधीचे रूपांतर कसे करायचे हे आपल्या हातात आहे . ह्या दोन्ही हातांचा उपयोग करून ते एकदा त्यांच्या समोर जुळवा आणि म्हणा नित्य तुमचे स्मरण असू द्या .
कोणताही मंत्र माहीत नाही ,संस्कृत ज्ञानाअभावी स्तोत्रे म्हणता येत नाहीत ,अनेक अडचणींमुळे सिद्ध ग्रंथांच्या उपासना होऊ शकत नाहीत ,यावर केवळ दोन्ही हात जोडत आपापल्या भाषेत प्रार्थना जरी केली तरी दत्त महाराज मनातल्या निस्सीम भावाला अवश्य जाणतात . या दत्त भक्तीची एक खासियत म्हणा किंवा वैशिष्ठ्य म्हणा . या जन्मात जर आपल्या प्रारब्धात दत्त महाराजांची उपासना असेल तर पुढील सर्व जन्म हे त्यांच्या सान्निध्यात जाणार हे नक्की . मग कोणत्याही योनीत जन्म होवो .
प्रचंड असे पाप पर्वत असताना देखील त्यांचे भस्म करीत आपले म्हणून जवळ करणाऱ्या दत्त महाराजांना शिरसाष्टांग नमस्कार !! नित्य अशीच कृपादृष्टी राहू द्या !! श्री गुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
No comments:
Post a Comment