विरोधाभास हे दत्त महाराजांचे एक आगळे वेगळे वैशिष्ठ्य . स्वरूपाची कल्पना करताना एक ठाम असे दैवताचे स्वरूप मनात असते . पण दत्त महाराजांचे तसे नाही ,अनेकदा तर भक्तांनी त्यांना आपण कोण असे देखील विचारले आहे . याची सुरुवात अत्रि ऋषींपासून होते . एका स्वरूपाचे ध्यान करत असताना तीन दैवते प्रकट झाली तेव्हा ते म्हणाले, एकाचे करिता ध्यान l तुम्ही तीन आलेत कोण ? l( द मा ३/५१) जनार्दन स्वामींना भेट देणारे दत्त महाराज हे एकनाथ महाराजांनी पाहिले आणि त्यांचा प्रथमतः विश्वास बसेना . तीच गोष्ट थोरल्या महाराजांची ,अवेळी खाली देवाचे कट्ट्यावर गेल्यावर त्यांना भव्य संन्यासी रूपात दर्शन झाले मग गोविंद स्वामी महाराजांनी त्यांना ते दत्त महाराज असल्याचे सांगितले .
महाराजांनी अगदी प्राणी रूप घेत सुद्धा अभक्ताना भयस्वरूपी सूचित केले आहे . नारायण स्वामी महाराजांनी त्यांच्यावर कठीण प्रसंग आलेला असताना दार लावून भगवद्भजन आरंभले तेव्हा दत्त महाराज सिहाचे रूप घेऊन त्यांचे भजन ऐकत असल्याचे दिसले . हे स्वरूप दाराच्या फटीतून पाहताच तेथील मठाधिपतिंची गाळण उडाली .
अत्यन्त बीभत्स अशा रूपात कोणी जवळ येऊ नये आणि ओळखू त्यापेक्षा नये दत्त महाराजांनी अनेकदा सर्वत्र संचार जरी केला तरी स्वरूपामुळे ते कळू शकत नाही . पण मग नित्य भेटून जाणाऱ्या आणि नाना रुपधर अशा या दैवताला कसे ओळखावे हा तर भक्तांसमोरील मोठाच प्रश्न आहे . याचे उत्तर म्हणजे त्यांच्या नामस्मरणात रममाण होणे आणि उपासनेत महाराजांना नित्य शरण जाणे .
अशा भक्तांना दत्त महाराज कोणत्याही स्वरूपात आले तरी निश्चित ओळख देतात आणि कृतार्थ करतात . अनेक बाबतीत असे दैवत अन्यत्र नाही .
कोणतेही वाहन नसलेला पण मनोवेगें सर्वत्र फिरणारा ,एकाच रूपाचे सोळा अवतार असणारा ,एके ठिकाणी न राहणारा ,प्रत्येकाला वेगळ्या स्वरूपात भासणारा ,असा हा परमात्मा दत्तात्रेय,अवधूत ,योगेश ,मायाध्यक्ष ,स्मर्तृगामी आदी नावांनी प्रसिद्ध आहे . कोणत्याही उपचाराची गरज न भासणारा ,केवळ जलाभिषेकाने संतुष्ट होणारा ,तुळस प्रिय आहे ,बेलही प्रिय आहे ,पवमान आवृत्या आणि रुद्र आवर्तने तितक्याच आवडीने ऐकणारा याखेरीज कोणीही नाही . नृसिंहवाडीसारख्या संगम क्षेत्री पठारावर आणि गिरनार सारख्या दुर्गम पर्वत भागात राहणारा अन्य कोणी नाही .
गुप्त स्वरूपात जरी ते आले तरी त्यांचे येणे लपून राहू शकत नाही . अनेकदा हे अवश्य सर्वाना जाणवत असेलच . सांप्रत काळ म्हणजे त्यांनी उपासनेकरिता उपलब्ध करून दिलेली सुवर्ण संधी आहे ,अवश्य लाभ घ्यावा, श्री गुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य
No comments:
Post a Comment