Thursday, 18 June 2020

हंपी


----------------------
 -: हंपी :-  
----------------------

कर्नाटक राज्यातील ऐतिहासिक महत्वाच्या स्थळात हंपीचा प्रथम क्रमांक लागतो. लोखंडाच्या कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेल्या होस्पेट या व्यापार-उद्योगाने गजबजलेल्या गावापासून ११ कि.मी
.वर तुंगभद्रा नदीतीरी वसलेलं हंपी (विजापूर २५४ कि.मी., बदामी १८० कि.मी.) म्हणजे १६ व्या शतकांतील बलाढ्य विजयनगर साम्राजाची राजधानी. मध्ययुगकाळात वैभवास चढलेल्या हंपीतील अवशेष पाहताना गतकालीन वैभवाच चित्र नजरेसमोर उभं राहतं. बाजारपेठ, हत्तीपागा, कमळराजमहल, झनाना राजवाड्याजवळील स्नानगृह, शाही हवेल्यांचे अवशेष, इत्यादी पाहताना मन भरून येतं. पुरातत्व खात्यातर्फे हंपीत अजूनही उत्खनन चालू आहे.
        सामर्थ्यशाली विजयनगरच्या या सुप्रसिद्ध राजधानीच्या शहराला विशेष शोभा प्राप्त करून दिली होती ती तेथील मंदिरांनी. त्यांतील बरीचशी आजही ब–यापैकी सुस्थितीत आहेत. विठ्ठल मंदिर, पंपापती मंदिर आणि ह्जारीराम मंदिर ही त्यांतील सर्वांत मोठी.
       हंपीतील सर्वोत्तम शिल्प म्हणजे विजय विठ्ठल मंदिर. विजयनगर वास्तुशिल्पाचा हा अजोड नमुना १६ व्या शतकात निर्मिला गेला. अभिजात कलाकुसरीच्या विठ्ठलमंदिरापुढील मंडपाच्या पोकळ दगडी कोरीव खांबातून निरनिराळ्या वाद्यांचे मधुर सूर निघतात. कोणत्या वाद्याचा स्वर त्या खांबातून निघेल हे कळण्यासाठी त्या वाद्याची वादकासहित प्रतिकृती त्या खांबावर कोरण्यात आलेली आहे.
विठ्ठल मंदिरासमोर त्याच आवारात दगडात कोरून काढलेल्या चार चाकी भव्य रथाचं लावण्यमय लक्षणीय शिल्प आहे.
      हंपी गावात प्रवेश करताना विरुपाक्ष मंदिराचं ११५ फुट उंचीचं गोपुर लक्ष वेधून घेत. कृष्णदेवरायांनी इ.स. १५१० मध्ये याचं नुतनीकरण केलं. यावरून त्याच्या बांधकामाचा काळ त्याधीचा असावा. देवालयासमोरच्या एका अंधे–या खोलीत ‘पिन होल” कॅमे-याचं प्रात्यक्षिक  पाहायला मिळत.

 दरवर्षी फेब्रुवारीत होणारी रथयात्रा आणि डिसेंबरमधील विरुपाक्ष व पंपा (पार्वती) यांचा लग्नसमारंभ हे येथील दोन प्रमुख उत्सव.
 विरुपाक्ष मंदिरात राहण्यासाठी खोल्या, धर्मशाळा असून त्यांच्या आरक्षणासाठी दि एक्झीक्युटीव्ह ऑफिसर, विरुपाक्ष मंदिर यांना लिहावं.
        उग्र नरसिंहाच्या २२ फुट उंचीची हंपीतील सर्वात मोठी मूर्ती. एकसंध दगडात बनवलेल्या या मूर्तीच्या मांडीवर लक्ष्मीची मूर्ती असल्याचा शोध अलीकडच्या काळात लागल्याने त्याला लक्ष्मीनरसिंह संबोधण्यात येतं.
      अखंड शिळेत खोदलेल्या गणपतीच्या दोन भव्य मूर्ती, १५ फुट उंचीचं अतिभव्य शिवलिंग, कृष्णदेवरायांनी १५१३ मध्ये बांधून मूर्तीची प्रतिष्ठापना केलेलं कृष्णमंदिर हे हंपीतील आणखी काही विशेष.
      हंपीच्या दक्षिण भागातील तुंगभद्रा काठीच्या टेकडीवर कोदंड रामाचा मंदिर असून याच ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी वालीवधानंतर सुग्रीवाला राज्याभिषेक केल्याचं सांगण्यात येतं. रामायणातील हीच ती किष्किंधा नागरी.
      देदीप्यमान गतकाळात नेणा-या हंपीला एवढ बघण्यासारखं आहे कि काय काय बघावं, असं या २६ कि.मी. क्षेत्रफळात विस्तारलेल्या नगरीत होऊन जातं. हंपी ते हॉस्पेटच्या दरम्यान सतत बसेस असून सिझनमध्ये हॉस्पेटहून कंडक्टेड टूर्सही असतात. प्रशिक्षित गाईड टुरिस्ट इन्फर्मेशन काऊंटर, हंपी बाजार किंवा टूरिस्ट ब्युरो, तालुका ऑफिस कॉम्प्लेक्स, हॉस्पेट येथे मिळू शकतील, मात्र मार्गदर्शक हा हवाच!
------------------------------------------------
संकलन :- सतीश अलोनी
-------------------------------------------------

No comments:

Post a Comment