Tuesday, 16 June 2020

श्री गुरुदेव दत्त


सर्वसामान्यतः आपले पाप आपल्याला दिसून येत नाही आणि जरी दिसले तरी या पापाचे समर्थन करण्यास आपण कायम समर्थ असतो. पापाचे समर्थन म्हणजे मी हे मुद्दाम केले नाही किंवा मला करावे लागले या अर्थी. इतरांसमोर पाप लपवले तरी त्या दत्त महाराजांपासून काहीही लपवणे शक्य नाही. आपल्या हृदयात नित्य वास करणाऱ्या दत्त महाराजांना या पापाची माहिती असणे स्वाभाविक नाही का ? दत्तभावसुधारस स्तोत्रात थोरले महाराज मात्र या पापरूपी मनाची स्वच्छ कबुली कशी द्यायची याचे उदाहरण समोर ठेवतात.

वेदाध्ययन केले नाही ,यथाशास्त्र कर्म पालन केले नाही ,संत समागम केला नाही ,वडीलधाऱ्यांची सेवा केली नाही ,पापकर्म आणि मी हे जवळचे नाते आहे . मला धर्म माहीत असला तरी माझी त्या ठिकाणी प्रवृत्ती नाही आणि अधर्म माहीत असून देखील माझी त्यापासून निवृत्ती नाही. आपण प्रेरणा देता ,तसे मी करतो.

आता आपण प्रेरणा देता तसे करतो मग इथे काय प्रार्थना करावी ? तर अहो दत्त महाराज अशी प्रेरणा द्या कि माझी कृती ,सेवा ,चलनवलन ,यात्रा ,चिंतन ,स्मरण ,स्तुती ,बोलणे ,इत्यादी सर्व काही हे प्रभो आपल्याविषयीच असावे . अशी बुद्धी दत्त महाराज देतील का तर निश्चितच देतील ,याचे कारण असे आहे कि माझ्या भक्तांचा नाश होणार नाही हि दत्त महाराजांची प्रतिज्ञा आहे . प्रतिज्ञा ते न भक्ता मे नश्यन्तीति सुनिश्चितम् ll

आपल्या पापाची कबुली देणे हा देखील भक्तीचा एक प्रकार मानला आहे ,याला सर्वस्वात्मनिवेदन असे म्हणतात .आजच्या दिवसात काय काय घडले ,मी काय काय कृत्ये केली ,घडलेले प्रमाद का टाळता आले नाहीत ,विषय वासना कशा तडाखे देत होत्या आदी गोष्टी दत्त महाराजांना नमूद करणे म्हणजेच सर्वस्वात्मनिवेदन आणि शेवटी प्रार्थना कि घडलेली पुण्य कृत्ये पुन्हा पुन्हा घडावीत आणि पाप कृत्ये कधीही होऊ नयेत यास्तव कृपा करावी . सर्व व्यापी आणि अंतर्यामी वसणाऱ्या त्याला काही ठाऊक नाही का ? पण हे सर्व उपचार उत्तरोत्तर शुद्धीकरिता नियोजिले आहेत,तेव्हा हे भगवन आपल्या भक्तीकर्मात नित्य तल्लीन होणारी बुद्धी द्यावी आणि उद्धार करावा . श्री गुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य

No comments:

Post a Comment