---------------------------------
कल्याणेश्वर शिवमंदिर, तेलंगखेडी
-----------------------------------
तेलंगखडी रोडवरील कल्याणेश्वर म्हणजेच महादेवाचे मंदिर दुसरे राजे रघुजी भोसले यांच्या आई चिमाबाई यांनी बांधले.
या देवळाचा दगड काळाशार आहे. या देवळाचा आराखडा आणि बांधणी यावर मध्यभारत शैलीचा प्रभाव दिसतो.
हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. उत्तर व दक्षिणेकडून अशी दोन प्रवेशद्वारे हे या मंदिराचे आगळेवेगळे वैशिष्ट आहे. पंचरथ आराखडा व शिखराचे सात विभाग मध्य भारताच्या शैलीची उदाहरणे आहेत.
हे मंदिर ४२×९ फूट लांब-रूंद असे चौकोनी आहे. गर्भगृहात प्रकाश येण्याकरिता ४ गवाक्ष आहेत.गर्भगारात तीन बाजूंनी तीन कोनाडे आहेत. गर्भद्वाराचे द्वार साधे असून दोन बाजूने असलेले द्वारपाल रेखीव आहेत. गर्भागार आणि सभामंडप यांना जोडणाऱ्या अंतराल मार्गावर कीर्तिमुख आणि अर्धचंद्र शीला यांनी सजवलेले दोन खांब आहेत. हे मंदिर सत्याण्णव खांबांच्या आधाराने उभे असलेले संगमरवरी कोरीव बांधकामाने नटलेले आहे.
गर्भगृहात चकचकीत तांब्याच्या पत्र्याने मंडीत संगमरवरी शिवपिंड व त्यावर अभिषेकाची संततधार असते. शिवपिंडीसमोर मंडपात काळ्या पाषाणाचा नंदी आणि बाहेरच्या मंडपात पार्वतीरूपातील लक्ष्मी, गंगा आणि दुर्गेची मूर्ती.
मंदिरात नियमित होत असलेला अभिषेक, स्तोत्रपठण आणि कीर्तन, प्रवचनाच्या लहरींमुळे तिथल्या वातावरणाला लाभलेल्या पावित्र्यामुळे शेकडो भाविकांची पावले मंदिराकडे वळतात.
नागपुरातील प्राचीन जागृत देवस्थानाचे पावित्र्य कायम राहावे, या उद्देशाने नागपुरातील प्रसिद्ध व्यावसायिक आशुतोष शेवाळकर यांनी १९९५ साली भोसलेंकडून हे मंदिर विकत घेतले.भारतीय पुरातत्त्व विभागाने २००३ साली श्रेणी १ दर्जा दिलेल्या या पुरातन शिवमंदिराची देखभाल शेवाळकर कुटुंबीय करीत आहे. मुळात संगमरवरी असलेल्या या मंदिरावर चुन्याची पुटं चढवण्यात आली होती. शेवाळकरांनी मंदिराचा जीर्णोद्धार करताना चुन्याचे हे थर काढून मंदिराचे संगमरवरी कोरीव कामाचे वैभव पुन्हा प्राप्त करून दिले आहे. मंदिराचा कळस पुन्हा एकदा लकाकू लागला आहे. या मंदिरात दररोज जवळपास १००-१५० भाविक दर्शनाला येतात महाशिवरात्रीच्या दिवशी इथे मोठी यात्रा भरते. लाखो लोक दर्शनाला येतात. भजन, कीर्तन आणि महाप्रसादात सहभागी होतात.
माहिती संदर्भ :-VidarbhaDarshan
----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
-----------------------------------------------

No comments:
Post a Comment