Monday, 1 June 2020

श्री गुरुदेव दत्त


अनधिकारी व्यक्तींसमोर वेद पठण ,आचार्यांच्या अद्वैताच्या सिद्धांताला खोडून काढणे ,अनधिकारी मनुष्याला मंत्रशास्त्राचे ज्ञान देणे हि सर्व महापापे आहेत . श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज हे नित्य या महापापांच्या विरोधात होते . जेव्हा जेव्हा भक्तांनी अथवा शिष्य वर्गाने अशा गोष्टी महाराजांच्या नजरेसमोर आणल्या तेव्हा तेव्हा महाराजांनी या सर्व पाप कर्माना आळा घातला . त्रिविक्रम भारती जेव्हा दोन मदोन्मत्त ब्राह्मणांना घेऊन महाराजांकडे आले तेव्हा महाराजांनी कशाला लक्ष देतोस असे नाही म्हटले . या महापातकाला इथे थांबवलेच पाहिजे .

वास्तविक पाहता या दोन ब्राह्मणांना पूर्ण वेद विवरण समजावताना गुरुमहाराजांचा मोठा वेळ या कारणी आला . महाराज म्हणाले , उगीच का जयपत्राचा हट्ट धरीत आहात . एक वेद शिकता व्यक्त l पाहिजे दिन कल्पांत ll अरे विप्रानो हे वेदज्ञान म्हणजे काही एखाद्या पुस्तकाची गोष्ट आहे का ? ब्रह्मा आणि भारद्वाज यांच्या संवादात भारद्वाजांना गिरिरुप अर्थात पर्वतप्राय आणि तेजस्वी अशा वेदांचे दर्शन झाले . हे वेदांचे रूप पाहून भारद्वाज मुनी शरण जात म्हणाले ,भगवन ,अहो हे कोणी कसे शिकू शकेल ? हे पाहून भगवान ब्रह्मा केवळ तीन मुष्टी वेदज्ञान अभ्यासाला देते झाले . तीन वेदांचे मंत्र वेगळे वेगळे करीत अद्याप भारद्वाज याचे पूर्ण ज्ञान प्राप्त करू शकले नाहीत . अजून पुरते नाही त्यासी ll

जयपत्र दिल्यास लोकापवाद होईल पेक्षा वाद घालावा असे म्हणत त्रिविक्रम भारतीनी वाद घातला नाही ,जे योग्य नाही ते गुरुमहाराज पाहतील ,असे म्हणत ते गाणगापुरी या विप्राना घेऊन आले . कुमसी ते गाणगापूर हे अंतर तीस किलोमीटरच्या आसपास आहे . हे अंतर त्रिविक्रम भारती चालत तर विप्र पालखीत बसले होते . यतींना पायी चालवत आपण पालखीत बसणे हे पातक झाले . यतीश्वरा चालावोनि l आपण बैसले सुखासनी l ब्रह्मराक्षसाचा जन्म नशिबी आला , तरी शेवटी महाराजांना शरण गेल्याने केवळ बारा वर्षात सुटका झाली . श्री गुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य

No comments:

Post a Comment