सध्या सर्व प्रकारच्या कामात वापरला जाणारा शब्द म्हणजे ओळख . या ओळखीवर जास्तीत जास्त कामे व्हावीत असा मनोदय असला तरी हा उपाय नेहेमीच लागू पडतो असे नाही . ओळख हा नेमका काय प्रकार आहे ? प्रशासकीय कामकाजापासून ते एखाद्या संस्थेपर्यंत सर्व ठिकाणी आपली कामे जलद ,बिनबोभाट व्हावीत म्हणून वापरले गेलेले व्यक्तिगत संदर्भ म्हणजे ओळख . सध्या अनेक ठिकाणी हा संदर्भ वापराचा प्रयत्न सुरु असला तरी हा ओळखीचा प्रकार देवाण घेवाणीचा आहे . तुम्ही एखादे काम दुसऱ्यामार्फत करून घेऊ शकता तसेच कोणी एखाद्या परिचयामार्फत किंवा ओळखीमार्फत तुमच्यापर्यंत आल्यास तुम्ही कामाला नकार देऊ शकत नाही . शेवटी कधीतरी तुम्ही देखील माध्यम ठरू शकता .
पण मग दत्त महाराजांच्या एखाद्या ग्रंथात किंवा वाङ्मयात हा -- च्या मार्फत ओळखीचा उल्लेख आला आहे का ? अजिबात नाही . मनुष्याच्या अधिकारांची ओळख आणि दैवतावरील श्रद्धा या मध्ये नेहेमीच श्रद्धेचा जय होतो . एक साधे उदाहरण घ्यावयाचे झाल्यास गुरुचरित्राचा चौदावा अध्याय घेता येईल . सायंदेव हा यवन दरबारात एक अधिकारी किंवा सेवक . पण त्याच्यावरील अधिकारी यवन प्रतिवर्षी एका विप्राचे प्राणहरण करत असताना या सायंदेवाने कुठल्याही ओळखीचा वापर करत मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला नाही . दत्त महाराज जिथे आहेत तिथे कोणत्याही -- च्या मार्फत प्रकारची गरज नाही . ज्याचे हृदयी गुरुस्मरण l भय कैचे तया दारुण ll कोणाचीही मध्यस्थी इथे नको आहे . दत्त महाराज सर्व काही संकल्प मात्रे करू शकतात . श्रद्धा मात्र हवी . सायंदेवाला श्रद्धेचे अपेक्षित फळ मिळाले . केवळ मृत्युयोग टाळणे नाही तर नित्य सान्निध्याचा आशीर्वाद मिळाला .
दत्त माहात्म्यात कार्तवीर्य पश्चात्तापाने पुन्हा दत्त महाराजांच्याकडे आला . माहूर येथील दत्त महाराजांच्या आश्रमात खरतर नित्य दर्शनार्थ येऊन दत्त महाराजांचा समस्त शिष्य परिवार हा अगदी उत्तम परिचयाचा झालेला होता ,पण कोणामार्फतही कार्तवीर्याने दत्त महाराजांपाशी रदबदली अथवा काही सांगणे हे केले नाही ,मनोमन दत्त महाराजांची अगदी रात्रभर प्रार्थना करीत होता .शेवटी सकाळी शांततपा नावाच्या मुनींना दया आली आणि त्यांनी कार्तवीर्याबद्दल आपणहून दत्त महाराजांकडे रदबदली केली .सर्व काही दत्त महाराज जाणत आहेत तेव्हा --- च्या मार्फत काहीही करायची गरज नाही .
दत्त महाराजांच्या लीला ह्या कामधेनुस्वरूपी आहेत . नित्य स्मरण आणि कीर्तन करीत असताना काही मनात संकल्प असल्यास ते अवश्य पूर्ण होतात . अनुभव घेऊन पहा ,श्री गुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य
No comments:
Post a Comment