Tuesday, 29 April 2025

ज्ञानेश्वरीत वर्णन केलेला सहा हातांचा गणपती..!


ज्ञानेश्वरीत वर्णन केलेला सहा हातांचा गणपती..!

हिमालयाच्या पहिल्या चढावाच्या टप्प्यातील कांगडा जिल्ह्यांत बैजनाथ गावीं महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.!

१९०५ साली झालेल्या भूकंपात हे एकमेव मंदिर ह्या जिल्ह्यांत वाचलें, ही मोठी ईश्वराची कृपा होय.!

पूजारी सांगत होते की, १०-१५ मिनिटें शिखरापासून काठीसारखें दोन-चारदा देऊळ डोललें पण अखेरीस सरळ जसेच्या तसेंच उभे राहिलें.!

या देवळावर एक लेख असून ते दोन सावकारांनी कोंगडयाच्या एका कडोच राजाच्या कारकीर्दीत बांधलें, असें त्यांत म्हटलें आहे.!

मंदिराच्या बाहेरील भागाच्या दगडांवर शिखरापर्यंत देवतांच्या निरनिराळया मूर्ती अलंकारांसह व वाहनादि परिवारासह इतक्या सुन्दर कोरल्या आहेत की, त्या डोळ्यात साठवून ठेवाव्याशा वाटतात.!

मंदिराच्या आवारांत शिरतांना दरवाजांत शिरल्याबरोबर दोन्ही बाजूस मूर्ती आहेत एक
मारुतीरायाची व एक गणरायाची.!

दोन्ही मूर्तींचे स्वरूप अलिकडच्या मुर्तींपेक्षा भिन्न असून मननीय आहेत.!

यांत गणरायाची मुर्ती फारच मनोहर असून त्यास सहा हात आहेत.!

ते पाहतांच मला ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी सहा हातांचा वर्णन केलेल्या गणरायाची मुर्ती कशी असेल, हे पुष्कळ दिवस न उलगडलेले कोडें मात्र येथे उलगडलें.!

ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीच्या गणेशनमनाच्या ओव्यांत "षड्दर्शनें म्हणिपती । तेच भुजांची आकृति" इथपासून पहिल्या अध्यायातील १० ते १३ क्रमांकाच्या ओव्यांत जे वर्णन आहे ते खालील प्रमाणे,

" देखा षड्दर्शने म्हणिपति। तेचि भुजांची आकृति
म्हणऊनि विसंवादें धरिती। आयुधे हातीं ॥१०॥
तरी तर्कु तोचि परशु । नितिभेदु अंकुश ॥
वेदान्त तो महारसु । मोदक मिरवे ॥११॥
एके होतीं दन्तु। जो स्वभावता खण्डितु ॥
तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥१२॥
मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकरू वरदु॥
धर्मप्रतिष्ठा तो । अभयहस्तु॥ १३॥"

पहिल्या दोन्हीं बाजूंच्या दोन हातांत परशु व अंकुश हीं शस्त्रे वणिली आहेत व तीं तर्क व नीतिभेद हीं सांगितली आहेत.!

तिसऱ्या हातांत वेदांतरूपी मोदक आहे आणि चौथ्यांत खण्डित दन्त आहे. हाच वार्तिकांचा बौद्धमत संकेतु' आहे. चार हात झाले.!

पांचव्यात पद्म म्हणजे कमल आहे, तो सत्कारवाद आणि सहाव्यांत अभय असून तेंच धर्मप्रतिष्ठा असें म्हटलें आहे.!

या सहा हातांना प्रारंभींच्या ओवीत षड्दर्शनें म्हणून याच कारणाने विसंवादरूपी किंवा
विसंवादाने आयूधें हातांत घेतली आहेत, असें म्हटलें आहे.!

या सर्व वर्णनावरून हात सहा आणि दर्शनें सहा हे निश्चित होतें; पण तीं दर्शनें कोणती आणि आयुधे कोणती येथेच थोडासा घोटाळा होतो.!

पण आश्चर्याची गोष्ट की, या बैजनाथाच्या ११ व्या शतकातील मंदिरातील गणरायाची मुर्ती सहा हातांची असून त्यांत हींच आयुधे दिली आहेत.!

मागील बाजूच्या दोन हातांत खरी आयुधे म्हणजे परशु आणि अंकुश आहेत.! नंतर डावीकडच्या दोन हातांपैकी खाली केलेल्यांत तुटलेला दन्त आणि मांडीवर ठेवलेल्या सोंडेच्या तोंडाजवळ नेलेल्या हातांत, जणू काय वेदान्त- मोदकाचा रस गजानन सोंडीने चाचपून पहात आहे.!

उजवीकडच्या दोन हातांपैकी खाली केलेल्या हातांत कमळ आहे आणि मांडीवर उभा ठेवलेला हात अभयरूपी कल्याण दाखवीत आहे.!

तात्पर्य १३०० च्या सुमारास ज्ञानेश्वर माऊलींनी दक्षिणेंत वर्णिलेल्या षड्भुज गणपतीची मुर्ती १२ व्या शतकाच्या आरंभींच्या कांगडा दरींत असलेल्या हिमालयाच्या पायथ्याशी आपल्यास पहावयास मिळते!

No comments:

Post a Comment