Thursday, 1 May 2025

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर


जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

मनुष्य जे काही कर्म करतो, त्याचे फळ भोगतो. ती कर्मे आठ प्रकारची आहेत. जे कुंडलीच्या माध्यमातून दिसून येतात. प्रत्येक कर्मावर एक एक ग्रहाचा प्रभाव असतो.

१) कर्म प्रकार १:- यालाच पूर्व जन्म कर्म किंवा स्वतःचे कर्म म्हणतात. पूर्व जन्मातील कर्मफळे जीवात्म्याला या जन्मात भोगावी लागतात. याच्यावर 'शनि' ग्रहाचा अंमल असतो.

२) कर्म प्रकार २:- यालाच घराण्याचे कर्म म्हणतात. अनुवंशिक कर्मसुद्धा यालाच म्हणतात. इंग्रजीत Hereditary Estate म्हणून ओळखले जाते. हिंदू मान्यतेप्रमाणे आपल्याला वाडवडिलांच्या बऱ्या वाईट कर्माचे फळ व्यक्तीला या जन्मात भोगावे लागतात. 'राहू' या ग्रहाचा अंमल असतो. कुंडलीतील बिघडलेला राहू अनुवंशिक आजाराचा बोध करतो.

३) कर्म प्रकार ३:- मातेच्या बऱ्या-वाईट पूर्ण कर्माचा भोग मुलाला भोगावा लागतो. याचा बोध कुंडलीतील 'चंद्र' ग्रहाच्या परिस्थितीवरून होते.

४) कर्म प्रकार ४:- पित्याच्या बऱ्या-वाईट पूर्व कर्माचा भोग मुलाला भोगावा लागतो. यालाच पितृकर्म म्हणतात. याचा बोध कुंडलीतील 'सूर्य' ग्रहाच्या परिस्थितीवरून होते.

५) कर्म प्रकार ५:- पती/पत्नी संबंध पूर्व जन्मात जे चांगले किंवा वाईट कर्म व्यक्तीच्या हातून घडले असेल, त्याचे कर्मफल या जन्मात व्यक्तीला भोगावे लागते. त्यालाच पती-पत्नी पूर्व कर्म म्हटले जाते. या कर्मावर 'शुक्र' या ग्रहाचा अंमल असतो.

६) कर्म प्रकार ६:- या प्रकारात संतती संबंधातील पूर्व कर्माचा तसेच पूढे होणाऱ्या संबंधाचा विचार होतो. यालाच संतती कर्म म्हणतात. यावर 'गुरु' ग्रहाचा अंमल असतो.

७) कर्म प्रकार ७:- यात इष्ट मित्राच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा समावेश होतो. त्यांच्या पू्र्व कर्माचा प्रभाव व्यक्तीवर पडतो. यावर 'बुध' ग्रहाचा अंमल असतो. बिघडलेला बुध निच प्रवृत्तीच्या व्यक्तींशी संबंध दाखवतो.

८) कर्म प्रकार ८:- या कर्माला भूमी कर्म/वास्तु कर्म म्हटले जाते. ज्या वास्तुशी/ भूमीशी आपला संबंध येतो, त्याचे चांगले-वाईट परिणाम मन्युष्याला भोगावे लागतात. यावर 'मंगळ' या ग्रहाचा अंमल असतो. प्रत्येक मनुष्याला या जन्मात वरील आठ प्रकारच्या बऱ्या-वाईट कर्मफळांना भोगावे लागते. दोन मार्गाने हे भोग भोगले जातात. एक शरीरद्वारे आणि दुसरे जीवात्म्याद्वारे. ज्योतिष शास्त्राद्वारे माणसाला मागील कर्माचा तसेच पुढील कर्म भोगाचा आणि सांप्रत कालाचा बोध होतो.

प्रतिकूल दैवाचे (प्रारब्ध) अनुकूल दैवात परिवर्तन करणे माणसाला अवघड असले तरी अशक्य मात्र नाही. 
उपाय:- यासाठी त्याला बुद्धी, संस्कार, मन यांचा योग्य तो सहकार आवश्यक असतो.
कर्म जरी अटल असले तरी दिर्घकाळ केलेल्या उपासनेमुळे त्यात बदल होऊ शकतो. या उपासनेत कुलदेवतेची उपासना सर्वश्रेष्ठ आहे. त्याशिवाय इतर कितीही उपासना केल्या तरी त्या फलदायी होत नाही.
संदर्भ- भविष्यवेध 📄 ✍

No comments:

Post a Comment