Wednesday, 5 November 2025

कारिट फोडल्याने काय होते?


कारिट फोडल्याने काय होते?
(कारिट यास कोहळा म्हणतात)

श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासुर हा फक्त राक्षस नाही तर कधीही नष्ट न होणारी अघोरी, दृष्ट वैचारिक शक्ती. अर्थात कोकणात हा दिवस ‘चावदीस’ म्हणून साजरा करतात. पण अभ्यंगस्नानानंतर किंवा स्नानापूर्वी ‘कारिट’ का फोडलं जातं, हा प्रश्‍न आजच्या तरूणांनी विचारला तर त्यात वावगे नाही. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी ही परंपरा नाही. तुळशीवृंदावनासमोर दिवाळीच्या पहिल्यादिवशी म्हणजे नरकासुराचा वध केल्यानंतर येणारी सकाळ... या दिवशी ‘कारिट’ फोडण्याची प्रथा आहे. या प्रथेचा उगम नक्की कधी झाला हे तितकेसे सांगणे कठीण असले तरीही, पूर्वजांची कल्पकता यातून प्रतित होते. नरकासुराच्या प्रतिकात्मक दहनासाठी कारिटाचा का वापर करण्यात आला? यामागचे विज्ञान आणि परंपरा आपण समजून घेऊया.
दिवाळी म्हणजे नक्की काय, तर सुदृढ आरोग्याचा संदेश देणारा एक सण. पूर्वजांनी आपली संस्कृती टिकविताना याचा पुरेपूर विचार केलेला दिसतोय. कारिट डाव्या पायाने फोडल्याचा परिणाम वेगळाच आहे. आयुर्वेदामध्ये डाव्या पायाच्या ग्रंथीची नाळ थेट मेंदूपर्यंत असते, असा उल्लेख आहे. कारिटाचा गंध नाकापर्यंत पोहोचविणे, जिभेला लावणे यालाही आयुर्वेदात महत्त्व आहे. रक्ताभिसरणाची क्रिया या गंधामुळे तीव्र होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. आणि ही प्रथा निर्माण करणार्‍यांची कल्पकता तरी बघा, नरकासुराचे विचार कधी बदलणार नाहीत, नष्ट होणार नाहीत, कारण तो दृष्ट आहे. तसेच कारिट हे एक असे फळ जे वेलीपासून तोडले तरीही वर्षभर टिकते. आज तोडलेले कारिट पुढच्या दिवाळीला वापरू शकतो. तांदळाच्या कोंड्यात न फोडता हे कारिट ठेवायचे. जसेच्या तसे राहणार. लोखंड किंवा अन्य शस्त्र लागून जर आपल्या शरिराच्या कुठल्याही भागाला सूज आली तर कारिट फोडून लावल्यास सूज उतरते. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना बहुतेकदा पायाच्या बोटांना, नखांना कोर होते, तर त्यावेळी बोट कारटात बुडवून ठेवतात. यामुळे कोर बरी होते. जखमही भरून येते. सर्वाधिक कडू असलेल्या या फळाची त्यासाठीच तर निवड केली असावी. पण मित्रहो, एक परंपरा म्हणून याकडे पाहू नका, तर त्यामागील भावनेचा विचार करा. आपल्यातले दुर्गुण, दुर्विचार यासोबत नष्ट करा. पूर्वी कारिट ग्रामीण भागातच फोडली जायची, पण आज शहरी भागातही ती फोडली जातात. बस्स आज एवढंच!

🙏🙏

No comments:

Post a Comment