दत्तभक्ती जणू एक मातृत्वच!
दत्त संप्रदायातील मुळ सुत्रातील,दत्तात्रेय भगवंताचे तसेच अवतारी सनकादिकांचे मातृत्वाप्रति असलेले नाते हे आपणास ठाऊक आहेच. आदिशक्ती स्वरूप असणाऱ्या, चारित्र्यवान अशा पुण्यरूपिणींच्या महातप तेजापुढे दत्त महाराज देखील नतमस्तक होतात.
जेथे श्री दत्तगुरुंच्या स्वरूपाच्या अगम्य वर्णनाची सिमा आहे तिथेच ह्या दैवी नारींच्या कर्तृत्वाचा उगम आहे.
ज्या अनंत कोटी ब्रम्हांडसुत्रधाराचे गोड गुलाबी रसपूर्ण ओठ , त्यांच्या जननीच्या दुग्धप्राशनाने मोतीबिंदू पडल्यासारखे पांढरे होतात, त्या आदिमायेचे दत्तगुरुंवर ऋणच आहेत
वरील मातृत्वाच्या संदर्भास अनुसूचित असे संबोधकाचे, साधकांना, दत्त तत्वाचे महत्त्व समजवून सांगणे आहे.
दत्तगुरुंची अनेक अनाकालनीय, अदभुत अशी दैवी स्वरूपे आहेत जसे की दुराचारी शक्तींना मारतानाचे उग्र स्वरूप, अनघालक्ष्मी सोबत असलेले संसारिक स्वरूप, व्रतस्थ मुद्रा धारण करणारे संन्यासी स्वरूप, विवस्त्र असलेले दिगंबर स्वरूप, ईत्यादी अभूतपूर्व स्वरूपे.
पण ह्या सर्व स्वरूपांचे सुशोभित पूजन, यथोपचाराने केले जाणारे चिंतन, यथार्थ केले जाणारे मनन आणि यथोचित समजले जाणारे अर्थ हे सर्व अगदी वेदशास्त्रयुक्त होणे जरा कठीणच आहे.
त्यामुळेच ह्या सर्व स्वरूपांच्या व्यतिरिक्त साधकाच्या अंर्तमनातील सात्त्विकतेला, पावित्र्यतेला देखील भुरळ पाडणारे दत्तरायांचे स्वरूप म्हणजे
"बालस्वरूप".
श्रींचे हे रूप फारच मनमोहक आहे, त्यामुळेच ह्या स्वरुपाची पुजा अर्चना करण्यापेक्षा ह्या रुपास समजून घेणे हे जास्त महत्वाचे आहे.
ह्या स्वरूपातील श्रींचे पुजन करण्यासाठी कोणत्याही वेदशास्त्रयुक्त सुतोवाच शाब्दिक मंत्रपठणांची मुळीच गरज नाही.
ह्या अनन्यसाधारण स्वरूपाची पूजा करण्यासाठी साधकाच्या अंर्तमनात "मातृत्वाचा" जाज्वल्य असा शिरकाव होणे गरजेचे आहे.
आत्मा हा स्त्री पुरुष ह्या दोन्ही भेदात्मक शारीरिक घटकांपासून अलिप्त आहे, त्यामुळेच त्यास संबोधित करण्यासाठी कोणत्याही व्यंजनाची गरज भासत नाही, मुळातच त्याची कण मात्र देखील आवश्यकता नाही व नसावी.
त्यामुळेच प्रत्येक मानवात स्त्री आणि पुरुष ह्या दोन्ही सगुण रुपांचे अस्तित्व असते, केवळ काही बाह्य घटकांनी त्याचे एक स्वरूप समाजासमोर येते.
जसा आत्मा ह्या दोन्ही स्वरूपांना अभिज्ञापक असतो तसेच सदगुरू देखील ह्या दोन्ही स्वरूपांनांच्या पलीकडे जाऊन आत्मिक भावाने केलेली भक्ती स्विकारतात. कोणत्याही जीवाची उत्पत्ति किंवा त्याच्या आत्म्यास लाभलेले पूर्णत्व हे केवळ "मातृत्व" ह्या एका तत्वावरच अवलंबून असते.
आपल्यातील मातृत्व जागृत करणे म्हणजेच अंगात, मनात सात्विकता आणने. मनातील अशुद्ध स्पंदने दूर लोटून मन पावित्र्याने दुथडी भरून वाहीले पाहीजे.
सर्वसामान्य तान्हे बाळ जसे रडू लागल्यावर आईने थोपटले की शांत होते तसेच श्री दत्तगुरुंच्या अवतारी स्वरूपांच्या लीला आहेत.
साक्षात त्रैमूर्ती देखील आईच्या सान्निध्यात येऊन शक्तिहीन झाले, आपले वैकुंठसुख विसरून पर्णकुटीतील गार भासणाऱ्या त्या मातीच्या भूमीवर अत्यंत तृप्तेतेने राहीले.
नरहरी बाळ देखील रडायला लागल्यावर अंबेच्या बोबड्या स्वरांकीत समजुतीच्या बोलाने शांत होत असे.
तसेच रागे भरून, टुमदार गोबरे गाल फुगवून, लाकडी झोपाळ्यावर बसलेले श्रीपादबाळ, सुमतीराणीच्या चार बोटांनी बनवलेल्या कटोरीतल्या मधुर दुधभाताचे चार घास भरवताच त्यांचा तो गोंडस राग लोण्यासारखा वितळून जाई.
मनात भक्तीचे जागर तेव्हाच उमटतात जेव्हा अंर्तमन आराध्यास बालस्वरूपी समजून मातृ वात्सल्याच्या ओढीने त्यांची मनोभावे सेवा करते. उगाच नाही ईतक्या तरण्याताठ्या चिरंजीवी तरूण युवक, श्री ज्ञानेश्वरास, भाविक "माऊली" म्हणून संबोधित करतात.
श्री थोरल्या महाराजांच्या तर कितीतरी छायाचित्रांमध्ये, त्यांनी दत्त मूर्तीस आपल्या पद्मासनास्थ मांडीवर घेतले आहे. आणि ते बालदत्त देखील अत्यानंद भावस्वरूपी भासत आहेत.
तात्पर्य काय तर प्रत्येक साधकाने आपले मन, आपले ध्यान आणि आपली गुरु प्रती असलेली सेवा ही एखाद्या मातेप्रमाणे ठेवावी जेणेकरून आपसुकच आपले दत्तगुरु हे दत्तबाळ होतात आणि त्यांच्या दैनंदिन पुजेबाबत कोण्त्याही प्रकारचे भय, मनी राहात नाही तर याऊलट आपल्या आराध्याचे एखाद्या बाळासारखे यथोचितपणे संगोपन आणि सेवाकार्य करायचे आहे अशी अवीट हर्ष स्वरूपाची जबाबदारी मनी आपसुकच येते.
_________
सुनंदन कृष्णराव राऊळ
मुंबई गोरेगाव
२१/०५/२०२०
_________
सुचना:-
कृपया आपण शेअर करतांना नाव न बदलता याच नांवाने शेअर करणे🙏🏻💐
_________
No comments:
Post a Comment