रामचरितमानस हा तुलसीदासकृत रामायण ग्रंथ , तुलसी रामायणात अर्थात रामचरितमानस या ग्रंथात अरण्यकांडात प्रभू श्रीराम आणि सीतामाई हे चित्रकूट पर्वतावर अत्रिमुनी आणि माता अनसूया यांची भेट घेतात याचे विस्तृत वर्णन आहे . मात्र या वर्णनात दत्त महाराज तिथे प्रभू रामांना भेटल्याचा उल्लेख नाही .
तुलसीदास या भेटीचा उल्लेख करताना म्हणतात ,
अत्रि के आश्रम जब प्रभू गवऊ l सुनत महामुनि हरषित भयऊ ll
रामप्रभु जेव्हा अत्रिमुनींच्या आश्रमात शिरले तेव्हा हे पाहून (बातमी ऐकून ) अत्रिमुनी हर्षित झाले . इथे त्यांना महामुनी हि उपमा दिलेली दिसून येते .
पुलकित गात अत्रि उठि धाए l देखि रामु आतुर चलि आए ll
मुनींच्या अंगावर रोमांच उठले आणि ते स्वागतासाठी धावत पुढे आले ,हे पाहून प्रभू श्रीराम शीघ्रगतीने चालत पुढे आले .
करत दंडवत मुनि उर लाए l प्रेम वारि द्वौ जन अन्हवाए ll
आता इथे द्वौ म्हटले आहे ,द्वौ म्हणजे दोघे प्रभू राम आणि लक्ष्मण . हे दोघे मुनींना दंडवत करत असताना मुनींनी त्यांना प्रेमाने हृदयाशी धरले आणि प्रेमाश्रुंनी स्नान घातले .
करि पूजा कहि बचन सुहाए l दिए मूल फल प्रभू मन भाए ll
आश्रमात आल्यानंतर या तिघांची ( म्हणजे प्रभु राम ,सीतामाई आणि लक्ष्मण ) मुनींनी षोडशोपचार पूजा केली आणि आश्रमातील कंद मूळ फळे आदी आहार समर्पित केला . हे समर्पित कंद मूळ प्रभुना आवडले .
या भेटीमध्ये अत्रिमुनींनी प्रभुरामचंद्रांची स्तुती केली असून यात बारा श्लोक आहेत . नमामि भक्तवत्सलं या सुरुवातीच्या श्लोकाच्या नावे ते प्रसिद्ध आहे .
या प्रसंगी अनसूया मातेने सीतेला काही भेटवस्तू दिल्या त्याचे वर्णन आहे .
दिव्य वसन भूषन पहिराए l जो नित नूतन अमल सुहाए ll
अनसूया मातेने सीतेला दिव्य वसने अर्थात वस्त्रे आणि आभूषणे दिली ,हि वस्त्रे नित्य निर्मल ,नवी ,राहणारी होती . याचबरोबर अनसूया मातेने सीतेला पातिव्रत्य धर्माचा उपदेश केला . रामायणाच्या अरण्यकांडात अत्रिमुनींची स्तुती तसेच अनसूया मातेचा सीतामाईला केलेला उपदेश हा फार सुंदर भाग आहे --- त्यावर लिहावे तेव्हडे थोडेच ,श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य
No comments:
Post a Comment