मी दत्ताचा दत्त माझा!
दत्त भक्ति ही अनेक युगांपासून चालत आलेली एक परंपरा आहे.
मुद्दामच या ठिकाणी परंपरा हा उल्लेख केला.
"परंपरा" हा शब्द एकाद्या घरापुरताच किंवा कुटुंबपुरताच मर्यादित असल्याचे आपल्याला दिसून येते. जिथे एकमेकांना न पाहता देखील एखाद्या दत्तप्रेमीस दुसऱ्या दत्तप्रेमीबद्दल वात्सल्य जाणवते.
दत्तसाधनेची ओढ ही आजपर्यंत आपल्याला घनघोर तपातून आणि त्या तपाच्या दर्शन रूपी फल श्रुती तून कळत आली आहे.
त्यामुळेच अनेक सनकादिकांच्या अगम्य तपश्चर्या आपल्यापुढे उदाहरणे म्हणून स्थित आहेत.
ह्या अवघ्या कलीयुगात, दत्त स्वरुपाचा साक्षात्कार होणे दुर्मिळ आहे त्याशिवाय कली युगातील दत्त साधकांच्या मानसिकतेची तुलना जर त्या माजी काळाच्या साधकांशी केली, तर अफाट असा फरक आढळून येईल आणि तो साहाजिकच आहे.
त्यामुळेच या युगात सर्वसाधारण गोष्टींमध्ये देखील दत्त शोधणारा साधक, आपल्या दृष्टीस सहजरित्या आढळून येईल.सध्याच्या साधकाची दैनंदिन दिनचर्या किंवा इतर कोणतेही वैशिष्ट्य पूर्ण कार्य हे एकाप्रकारे जाज्वल्य असे तपच आहे..!
त्यामुळे वरील वाक्य सिद्ध करण्याची अनेक उदाहरणे आहेत.
आपण एखाद्या दत्त क्षेत्री भेट देतो, तेव्हा अनपेक्षित पणे मंदिरात प्रवेश कराताच सुरू झालेली आरती ही आपल्या साठी एका प्रकारे गत तपाची फल श्रुतीच असते.
आता हे तप म्हणजे, दत्त दर्शनासाठी आसुसलेल्या मनाची अस्वस्थता आहे.
कारण आपले मन दैनंदिन जिवनात देखील, एखाद्या मिलींदा सारखे दत्त चरणी भुरभुरत असते, त्यामुळे ह्या व्याकुळते साठी अनपेक्षित पणे आरती मिळने हा एक साक्षात्कारच असतो. आरतीने दुमदुमून गेलेल्या दत्तदरबारात आपण काळभान विसरून तल्लीन होतो. मंदिरात पाऊल ठेवताच, अगदी अचानकच धावपळ दिसते,घंटानाद सुरू होतो, धूपाचा घमघमाट येतो, गाभाऱ्यापर्यंत रांगा असतात, आपण आलोय त्याच स्थितीत ऊभे राहणे, धूपाचा वास नाकपुड्यांमध्ये ठासून घेणे, आरतीचे शब्द कळत नसले तरी सुद्धा प्रत्येक चाल अगदी कान लावून ऐकणे, श्रींची मूर्ती जरी धुपामुळे, गुरुजींच्या आड येण्यामुळे झाकली जात असेल तरीसुद्धा डोळे मोठे करून, मान लांबलचक करून श्रींना पाहण्याची धडपड करणे.. ही सर्व फल श्रुतीच आहे! आरती संपन्न झाल्यावर आपण आणलेले श्रींसाठीचे साहित्य, श्री गुरुचरणी अर्पण करताच प्रसाद रूपी मिळणारे, पिवळे सुगंधी फुल हे तर परमानंद प्रदान करणारे आहे.
आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात.
अहो... अनपेक्षितपणे दुरदर्शन लावल्यास अचानकच जरी "देऊळ बंद" हा चित्रपट लागला असेल , आणि पिठापूर व कुरवपुराचे दर्शन हे "गुरुचरित्राचे कर पारायण" ह्या गाण्या बरोबर दाखवत असतील तरी सुद्धा रिमोट वर असलेला तो हात आणि दुसरा हात आपसुकच छाती जवळ येऊन जोडले जातात. मग तो चित्रपट कितीही वेळा जरी पाहीला असेल तरी सुद्धा मनात निर्माण होणारे नवे भक्तीचे प्रखर जागर, नमस्कार करायला भाग पाडतातच. प्रत्येक वेळी आपल्याला मनातून काही नवीन, अदभुत असे जाणवत नाही का? नेमका दर्शनाचा विलक्षण भाग जवळ येत असेल तर आपसुकच पाठीचा कणा ताठ होतो, अंगातील मरगळ जाते, चित्त रोमांचित होते. पसरवलेले पाय जवळ येतात, डोळेेदेखील लख्ख होतात, आणि मनात का कोण जाणे एक वेगळेच कुतुहल जागृत होते . हा प्रसंग एखाद्या साक्षात्कारा सारखाच असतो. फरक फकत एवढाच कि या साठी वेदशास्त्र युक्त तपश्चर्या कराव्या लागत नाही, या साठी केवळ भोळीभाबडी श्रद्धा आणि दृढ़ विश्वास लागतो.
ही लक्षणे केवळ चार भिंतीं पुरती मर्यादित न राहता घराबाहेर देखील तितक्याच विलक्षण रित्या झळकत राहतात.
घरातून बाहेर पडलेला साधक, घरी परतताना त्याच्या कापडी पिशवीत भाज्यां सोबतच आपल्या गुरुमाऊलीं साठी, एका छोट्याशा पानात पांढऱ्या दोऱ्याने बांधलेली, मंत्रमुग्ध करणारी चाफ्याची फुले देखील घेऊन येतो...यावरून हे सिद्ध होते की एखाद्या वेळी साधक स्वताच्या मुलभूत गरजा विसरेल पण गुरुचरणांची सेवा, मनात अखंड प्रज्वलित ठेवेल!
आपण म्हणतोय खरं... कि कलीयुगात देवांचे गुप्त स्वरूपात भ्रमण आहे.. दुराचार, अत्याचार, दुःख, दारिद्रय, मनस्ताप, अशांति, लोभ, रोग ह्या सर्व षड्यंत्रांनी हे कलीयुगा ठासून भरलेले आहे... जप तप, कठोर एकांत साधन ह्या युगात होणे शक्य नाही... अशी बरीच भिन्न मत आहेत.
पण या सगळ्या मतांवर मात करून, दत्तप्रेमी आजही अगदी श्रद्धावन्त भावनेने, आपला दत्त त्याच्या दैनंदिन कार्यात शोधण्याचा यथार्थ प्रयास करत आहे. आणि त्याला पदोपदी , आपल्या स्वरूपाची अनाकालनीय प्रचिती प्रदान करणारे दत्तच आहेत यात कण मात्र देखील कुशंका नाहीत.
हा विश्वास, हि श्रद्धा किती निर्मळ आहे, साधी आहे ह्या श्रद्धाेस टिपण्यासाठी कोणताही कागद तयार होऊ शकत नाही, या भक्तिस मांडण्या साठी कोणतीही शाई समर्थ नाही, ह्या विश्वासाचे माप घेण्यासाठी कोणताही मापदंड नाही.... हे सहस्त्रपटीने खरे आहे.
आणि त्यामुळेच हे प्रेम केवळ तो साधक आणि श्री दत्तगुरुच जाणू शकतात, अनुभवू शकतात आणि समजू शकतात.
_________________________
सुनंदन कृष्णराव राऊळ
मुंबई गोरेगाव
२६/०५/२०२०
_________________________
_________________________
*सुचना*:-
*कृपया आपण शेअर करतांना नाव न बदलता याच नांवाने शेअर करणे*🙏🏻💐
_________________________
No comments:
Post a Comment