Sunday, 31 May 2020

साधना म्हणजे चैतन्याचा अखंड स्रोत...धुनी


साधना म्हणजे चैतन्याचा अखंड स्रोत...धुनी

धुनी हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर कोणत्या गोष्टी येतात?
जी अखंड पणे जळत असते ती धुनी, जीच्यावर कोणत्याही ऋतुकालाचा परिणाम होत नाही ती धुनी, जिच्यात कितीतरी समिधा  जळून जातात पण त्याची राख परम पवित्र म्हणून साधक आपल्या मस्तकी आणि अंगावर धारण करतात ती धुनी,
 धुनी म्हणजे अखंड चैतन्याचा वाहता स्त्रोत.
जी योगीजनांना प्रचंड प्रिय असते ती धुनी, साधनाकाळात जी योग्यांना परमावश्यक असते ती धुनी.

असो सांगायचा मुद्दा असा, धुनी ज्याप्रमाणे अखंडपणे जळत असते किंवा तेवत असते तशीच आपली साधना कायम 12 ही महिने अखंडपणे धडधडत असली पाहिजे, त्यात स्वतःला म्हणजेच "मी" पणा , विकार इत्यादी तत्सम गोष्टींना भस्म करण्याची तयारी असली पाहिजे. धुनी जळून झाल्यावर शेवटी उरेल ते ब्रम्ह. 
निर्गुण निराकार, जे अखिल सृष्टी आणि ब्रह्मांडाला व्यापून आहे ते ब्रम्ह. 
कुंभार जसे मडके घडवतो तसेच आपण आपले बाह्य शरीर असते, ते जळून गेले की परत उरते ते ब्रम्ह.

आपणही त्याच परब्रम्हाचा एक अंश आहोत, निर्गुण निराकार, नित्य सत्य अविनाशी असे तत्व.
जडदेहात अडकल्यामुळे शरीर म्हणजेच मी अशी धारणा करून बसतो आणि तिथेच फसतो.
तेव्हा या जंजाळातुन बाहेर पडून परत उलटा प्रवास चालू करायचा असेल (म्हणजेच मी कोण आहे हे  ओळखण्यासाठीचा प्रवास), तर साधनेशिवाय गत्यंतर नाही.
तेव्हा धुनीचा आदर्श घेऊन स्वतःला त्या अखंडपणे तेवणाऱ्या धुनीत झोकून द्यायची तयारी हवी. आपल्या बाह्यमनाने गोळा केलेला कचरा त्या साधनारुपी धुनीत जाळून  जेव्हा भस्म करू तेव्हा उरेल ते निव्वळ आणि निव्वळ परम प्रकाशमय असे स्वतःचे सद्गुरू तत्व .
जिथे परमेश्वर आणि मी हे एकच आहोत हा द्वैत भाव संपेल तोच क्षण , हे जेव्हा प्रत्ययाला येईल तेव्हाच साधना सफल होईल.
एकदा इथे पोहोचलो की जिवंतपणीच मोक्ष अनुभवास येईल हे नक्की...

श्री गुरुदेव दत्त....🌹

साभार धन्यवाद: दत्तमहाराज

No comments:

Post a Comment