अत्रिवरद भगवान दत्तात्रेय यांनी जी आयुधे अथवा चिन्हे धारण केलेली आहेत , त्यांचे प्रयोजन आपण लक्षात घेणे उपासनेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. वस्तुत: , भगवान श्रीदत्तात्रेय हे परिपूर्ण आत्मस्वरूप असल्यामुळे व ते षडगुणैश्वर्यसंपन्न असल्यामुळे त्यांना काही मिळवावयाचे नाही पण भक्त्तजनांच्या कल्याणासाठीच त्यांनी ती आयुधे धारण केलेली आहे.
माला : —
माला ही जपाकरता धारण करावयाची असते. ' माल्यते इति माला ' अशी माला शब्दाची व्युत्पत्ती आहे. दत्तात्रेय यांना तर जप करण्याचे काहीच कारण नाही . मग ही माला कशाला ? तर या माळेतील मण्यांची संख्या बावन्न आहे. बावन्न मणी म्हणजे बावन्न अक्षरे असून त्यांना बीजमंत्राचे सामर्थ्य असल्याचे सांगितले जाते.
कमंडलू :—
दत्तात्रेयांनी कमंडलू धारण केलेला आहे .कमंडलू म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे जलपात्र होय.परमात्मा हा नात्यशुद्ध व तृप्त असल्यामुळे त्याला जलाची आवश्यकताच नाही. तर हा जलपूर्ण कमंडलू म्हणजे संसार स्थितीला कारणीभूत होणार्या कर्माचे प्रतीक सांगितले जाते.
त्रिशुळ आणि चक्र :—
त्रिशुळाचे तिन टोके म्हणजे आचार , व्यवहार व प्रायश्चित्त यांची प्रतीके आहेत , तर सुदर्शनचक्र ज्ञानस्वरूप असून अज्ञानजनक भ्रांती दूर करणारे आहे.
शंख : —
शंख हा आपल्या विशिष्ट नादाने आनंद देत असतो. नित्य आनंदस्वरूप असलेल्या दत्तात्रेयांना शंखनादाने काय आनंद मिळणार ? तर शंख हा वेदातील विधी , कर्मचोदनांचा प्रतीक असल्याचे सांगितले जाते.
डमरू : —
डम रूच्या नादानेही निजानंदामध्ये निमग्न सलेल्या दत्तात्रेयांना अधिक काय आनंद मिळणार? डमरू हे वेदशास्त्रावरिल प्रभुत्वावरील द्योतक आहे.
अशा रितीने दत्तात्रेयांना कोणत्याच आयुधाचे काही प्रयोजन नसताना त्यांच्या सहाही हातांत ही चिन्हे अथवा आयुधे त्यांनी का धारण केली ? दत्तात्रेयांच्या या मंगलमय सगुण—साकार रूपाच्या ध्यानानेच उपासकांची मने शांत व प्रसन्न होतात आणि त्यांना सर्व सिद्धींचा लाभ होतो. याच अभिप्रायाने परमेश्वराने दत्तात्रेय य्ंच्या अवतारात हे रूप व ही आयुधे धारण केलेली आहे.
श्रीगुरूदेवदत्त
No comments:
Post a Comment