---------------------------
मंदिरातील सुरसुंदरी
----------------------------
सुर अथवा देवलोकातुन आलेली सुंदर तरुणी असा याचा अर्थ आहे. या मुळात यक्षिणी असतात असा समज आहे.
त्या देवदेवतांच्या सेविका अशा रूपात मूर्तीच्या शेजारी कोरलेल्या असतात.
मध्ययुगात निर्माण झालेल्या मंदिरांच्या विशेषतः मौर्य काळानंतरच्या मंदिरांमधे या सुंदरी दिसून येतात. स्त्रियांच्या आयुष्यातील विविध टप्पे आणि त्यातील त्याची रूपे अशा शिल्पातून अंकित केलेली दिसून येतात. देवाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना बोध करून देणे हा या सुंदरी अंकित करण्यामागचा शिल्पकार आणि निर्मितीकाराचा हेतू असावा. "क्षीरार्णव" या संस्कृत ग्रंथात सुरसुंदरी यांच्याविषयी सविस्तर विवेचन आले आहे.
सुरसुंदरी म्हणजे देवांगना.
सुरसुंदरी म्हणजे अप्सरा वा पर्या असाही समज आहे. समुद्रमंथनातून त्या बाहेर आल्या असाही अनेकांचा समज आहे. या सुरसुंदरीचा मंदिराच्या भिंतीवर असण्याचा उद्देश काय ? प्रयोजन काय ?
हे समजणे महत्वाचे आहे..
शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध हे ५ विषय एकएकटे सुध्दा मारक असतात..
मानवाला तर या ५ विषयांनी पूर्णपणे ग्रासल आहे. मग त्यांची स्थिती कशी होईल.
भक्तगणांनी मंदिरात जातांना कसे सावध चित्त असावे, या संबंधीचे सूचन करणार्या सुरसुंदरी आहेत. शिवाय, काही जणी देवाच्या दर्शनाला जातांना देवाला काय अर्पण करावे,देव दर्शनाला कसे जायचे असते इत्यादिंचे मार्गदर्शन करतात.रिक्तहस्ते देवाला जायचे नसते. पान,फळ, फुल इ. काहीच जवळ नसतांना केवळ पाणी सुध्दा मनोभावे देवाला अर्पण केले तरी चालते.
गीतेत याविषयी छान श्लोक आहे.
पत्र वा पुष्प जो प्रेमे फळ वा जळ दे मज ।
ते त्या पवित्र भक्तांचे अर्पिले खाए मी सुखे।।
डालमलिका, पद्मगंधा, जया इत्यादी सुरसुंदरी हेच सुचवित असतात..
या सुरसुंदरी देखण्या तर असाव्या लागतात परंतु त्यांच्यात मानवी भावभावना आणि कार्यमग्नता सुध्दा असावी लागते. मध्ययुगीन मंदिरावर मोठ्या प्रमाणात सुरसुंदरीची शिल्पे कोरण्यात आली आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे भक्तिसंप्रदायाची असणारी त्या काळातील लोकप्रियता.
देवालय ही त्या गावांतील सांस्कृतिक केंद्र होती. भक्तजनांमध्ये नितीमूल्य निर्माण करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
नृत्यांगना, वादनमग्न सुरसुंदरी देवतांचे मनोरंजन करणार.
अप्सरा भक्तांना मंदिराकडे आकर्षित करणार.
आपल्या लक्षणांनी गुणांनी सुरसुंदरी भक्तांना इच्छा, वासना, मोह, विकार यापासून परावृत्त करणार आणि त्यानेच भक्तांचा उध्दार होईल.
मंदिरावर गळ्यात लहानस, डमरुसारख वाद्य अडकवून ताल धरणार्या सुरसुंदरीस मर्दला असे म्हणतात. उर्वशी, मेनका, तिलोत्तमा या बहुदा प्रतापाची जाणीव करुन देण्यासाठी कोरलेल्या असाव्यात.
सुरसुंदरी ज्या भावभावना, गुणधर्म वा हेतु प्रकट करतात. ते सर्वच ठिकाणी आढळत असेल तरी कलेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या प्रकटीकरणात वेगळेपण असेल्याचे जाणवते. अनेक ठिकाणच्या मंदिराच्या गाभार्याच्या प्रवेशद्वारापाशी २ सरीतांची शिल्पे कोरलेली असतात. ती गंगा आणि यमुना यांची होत. त्यांच्या हातात जलकुंभ दाखविलेला असतो. तर पायाशी क्रमाने मकर व कासव कोरलेले असेत.
माहिती संदर्भ :- आंतरजाल
------------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
------------------------------------------------

No comments:
Post a Comment