षड्भुज रूपात दत्त महाराजांनी अनेक आयुधे धारण केलेली आहेत ,आता प्रश्न असा कि संकल्पमात्रे सर्व काही करू शकणाऱ्या दत्त महाराजांना आयुधांची काय गरज आहे ?
अगदी संन्यस्त स्वरूपातील दत्त महाराजांच्या अवतारात देखील पहा . हातातील दंड हे केवळ संन्यस्त स्थितीचे प्रतीक न धरता चुकणाऱ्या भक्तांना आणि सर्व अभक्तांना तो एक अंकुश आहे . थोरल्या महाराजांनी याचे करुणात्रिपदीत उदाहरण दिले आहे . अपराधास्तव गुरुनाथा l जरी दंडा धरिसी यथार्था ll हा दंड म्हणजे न्यायव्यवस्थेचे प्रतीक देखील म्हणता येईल .
दत्त महाराजांच्या एका आरतीत --- शरणागता जना पाठीशी घालुनी l कळिकाळासी मारी सोटा रे l (अरे प्राण्या सावळा सद्गुरू तारू मोठा रे ll ) दत्त महाराजांच्या हातात सोटा अर्थात दंड आहे . त्यांच्या समोर कली आणि काळ हे दोघेही निष्प्रभ होतात हा मतितार्थ .
पण मग षड्भुज ध्यानात आयुधे का या प्रश्नावर दोन उत्तरे आहेत . पहिले म्हणजे त्रिमूर्ती स्वरूपातील प्रत्येक देवतेच्या हातातील दोन प्रतीके अथवा स्वभाव दर्शनाच्या गोष्टी या षडभुज रूपात आलेल्या आहेत . ब्रह्म स्वरूपाची दोन ,शिव स्वरूपाची दोन आणि विष्णू स्वरूपाची दोन अशी ती प्रतीके आहेत . तर दुसरे म्हणजे हि आयुधे लोक शिक्षणाकरिता धारण केलेली आहेत पण सर्वसामान्यतः आयुधांचा उपयोग कधी केला आहे का ? वेळ येताच दत्त महाराज त्याचा अवश्य उपयोग करतात .
या आयुधांचा विचार करता दत्त महाराजांनी स्वसंरक्षण हेतू कोणत्याही अवतारात काहीही वापरलेले नाही हि गोष्ट अवश्य लक्षात येते . मायाध्यक्ष असणाऱ्या दत्त महाराजांना प्रतिस्पर्धी किंवा आव्हान देणारा कोण असणार आहे ? कोणीही नाही ,तेव्हा कवच ,ढाल अशा कोणत्याही उपायाची गरज नाही . अनेक उदाहरणे घेता येतील ,गुरुचरित्राच्या दहाव्या अध्यायात दोन्ही हातात दोन आयुधे घेत श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज प्रकट झाले . एका हातात खडग तर दुसऱ्या हातात त्रिशूल . अत्यंत आवेशपूर्ण आणि क्रुद्ध मुद्रा . कुठून आले ,कोण आहेत याची कल्पना करेपर्यंत महाराजांनी दोघा चोरांना ठार केले होते . तेव्हा तिसऱ्याने पाया पडत जीवदान मागितले . भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी हि बिरुदे इथे सार्थ केलेली दिसून येतात .
दत्त महाराजांनी अनेकदा हि आयुधे संरक्षक कवच म्हणून देखील वापरलेली दिसून येतात . दत्त माहात्म्यात याचे उदाहरण म्हणजे नहुषाच्या रक्षणार्थ दत्त महाराजांनी सुदर्शन चक्राची योजना केली होती . नहूष यावेळी काही दिवसांचा होता . याचे हनन करण्यासाठी बल्लवाने या लहानग्या जीवावर दोन वेळा प्रहार केला . पण सुदर्शन चक्राने मध्ये येत संरक्षकाची भूमिका बजावली आणि ते प्रहार वृथा गेले .
दत्त कवचापासून ते माला कमंडलू या ध्यान श्लोकापर्यंत दत्त महाराजांच्या सहा हातात सहा गोष्टी कोणत्या आहेत ते वर्णन केले आहे ,यात माला कमंडलू खालील हातात ,मधल्या दोन हातात डमरू आणि त्रिशूल तर वरील दोन हातात शंख आणि चक्र या गोष्टी आहेत . मात्र हे ध्यान रूप सर्वत्र दिसत नाही . काषाय वस्त्रं श्लोकात दंड कमंडलू हि संन्यस्त चिन्हे तर वरील चार हातात शंख चक्र गदा आणि पद्म हि भगवान विष्णूंची आयुध आणि चिन्हे आहेत .
आचार ,व्यवहार आणि प्रायश्चित्त यातील प्रायश्चित्त या भागात कर्मविपाक हा भाग येतो . या कर्मविपाकातील फलस्वरूप शासन दत्त महाराज या आयुधांकरवी करतात असेही म्हणता येईल .अनेक संदर्भ आणि त्यावरील उहापोह पाहता विस्तारभयास्तव इथेच थांबतो . श्री गुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य
No comments:
Post a Comment