🕉🌹श्री दत्तात्रय - तांत्रिक गुरू🌹🕉
तंत्रसाधनेतील अलौकिक कर्तृत्वामुळे दत्तात्रेयांना श्रीगुरू हे स्थान प्राप्त झाले. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी योगसाधना व गुरुसंस्थेची महनीयता ही दत्तात्रेयांची दोन प्रमुख वैशिष्ट्ये. नाथसांप्रदायिकांच्या मते दत्तात्रेय ही ‘योगसिद्धी’ प्राप्त करून देणारी देवता आहे. शाक्तपंथाच्या तंत्रसाहित्यात दत्तात्रेयांचे स्थान सर्वश्रेष्ठ असून यांना त्रिपुरसुंदरीच्या उपासनेचे प्रवर्तक मानले आहे. त्रिपुरारहस्याचे विवेचन करणारी अष्टादशसहस्त्री ‘दत्तसंहिता’ दत्तात्रेय प्रणित असून ‘दत्तात्रेय तंत्र’ नामक ग्रंथ शाक्तपंथात प्रमाणभूत मानला गेला आहे. दत्तोपासनेत सर्वत्र प्रचलित असलेले ‘दत्तात्रेय वज्र कवच स्तोत्र’ शाक्तांच्या ‘रुद्रयामल तंत्रा’तील आहे. या सर्व बाबींचा विचार करून काही संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे, की इसवी सनाच्या प्रारंभी त्रिपुरोपासक शाक्त उपासनेच्या क्षेत्रात दत्तात्रेयाची निर्मिती झाली असावी. कदाचित या तंत्रप्रणालीचा प्रवर्तक दत्तात्रेय नामक कोणी महान सिद्धपुरुष असावा आणि त्याचेच पुढे पुराणांच्या अंतिम संस्कारांच्या काळी दत्त दैवतात रुपांतर झाले असावे.
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
श्री दत्तात्रय - त्रिपुरादेवी उपासना मार्ग
तंत्रसाहित्यातील दत्तात्रेय हा प्राधान्याने त्रिपुरादेवीच्या उपासनेचा प्रवर्तक आहे. त्रिपुरा म्हणजे (त्रि+पुरा-पूर्वी) त्रयीच्या-ब्रह्मा-विष्णू-महेशांच्या पूर्वीची, अनादि शक्ती. तिचे रहस्य जो जाणतो तो त्रिपुरारहस्याचा उद्गाता दत्तात्रेय होय! तंत्रसाहित्यात दिसणारे दत्तात्रेयाचे स्वरूप हेच दत्तात्रेयाचे आद्य स्वरूप असावे, असे प्रस्तुत लेखकाला वाटते. इसवी सनाच्या दहाव्या शतकात या तांत्रिक साधनेला जो विकृत, वामाचारप्रधान असे स्वरूप आले तसे स्वरूप येणे स्वाभाविकच होते. दत्तसंप्रदाय ही मराठी भक्तिपरंपरेची एक प्रभावी धारा असून नाथसंप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्तसंप्रदाय आणि समर्थ संप्रदाय या पंचगंगांनी प्राचीन मराठी साहित्य व संस्कृती यांचे सर्वांगीण भरणपोषण केले.
ब्रह्मपुराणात दत्तात्रेयांच्या अवताराचा हेतू सांगितला तो असा – “जो सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा आहे, त्या विष्णूचा दत्तात्रेय नामक अवतार झाला. हा क्षमाप्रधान होता. त्याने वेदांना प्रतिष्ठा मिळवून दिली. यज्ञसंस्थेतील चातुर्वण्यातील प्रजेत विलक्षण सामर्थ्य निर्माण केले. दत्तात्रेयांचे अत्रिऋषि पिता व अनसूया माता होत. अत्रि ऋषींना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जाते. चित्रकूटाजवळ पयस्विनी नदीच्या काठी त्यांचा आश्रम होता. त्यांच्या कठोर तपश्चर्येमुळे विलक्षण ब्रह्मतेज निर्माण झाले. पृथ्वीतलावरील चारीही वर्णांतील लोकांची काळजी सतत वाहणारे अत्रि ऋषि लोकमान्यता पावले होते. त्यांच्या तप:सामर्थ्यावर लुब्ध होऊन कर्दम प्रजापतीने आपली ‘अनसुया’ नावाची कन्या त्यांना दिली. ती नावाप्रमाणेच असूयारहित होती. तिने तपस्या करून शंभू महादेवाला प्रसन्न करून घेतले होते. याच अत्रि आणि अनसूयेचे पुत्र ‘दत्तात्रेय’, ‘दुर्वास’ आणि ‘सोम’ हे होत. ‘शुभात्रेयी’ नामक कन्याही होती. पतिपरायण अनसूयेच्या तेजामुळे त्रैलोक्यातील लोक प्रभावित झाले. इंद्राचे आसन डळमळीत झाले. इतकेच नव्हे, तर नारदाने केलेल्या सतीत्वाच्या गौरवामुळे ब्रह्मा, विष्णू, महेशांच्या पत्नींच्या मनात अनसूयेविषयी असूया निर्माण झाली. अनसूयेचे सत्त्व हरण करण्यासाठी त्यांनी आपल्या पतींना अतिथिवेषाने अनसूयेकडे पाठविले. आश्रमात अत्रि नव्हते. अनसूयेने अतिथींना विश्रांती घेण्याची विनंती केली; परंतु सत्त्वहरणाच्या हेतूने आलेल्या त्रिदेवांनी तिच्याकडे मागणी केली, की “तू विवस्त्र होऊन भोजन वाढणार असशील तरच ते आम्ही स्वीकारू.” अनसूयेने ते तत्काळ मान्य केले आणि त्रिदेवांच्या मस्तकावर पतिस्मरणपूर्वक तीर्थ शिंपडले. तत्क्षणीच त्या तिघांची बालके झाली. पती गंगेवरून परतताच त्यांच्यापुढे तिन्ही बालके ठेवून “स्वामिन् देवेन दत्त” असे म्हटले. अत्रिंनी त्यांचे नामकर्ण ‘दत्त’ असे केले.
इकडे आपल्या पतीची वाट पाहून थकलेल्या देवभार्या पतिशोधार्थ अत्रि ऋषींच्या आश्रमात आल्या, त्यांना अनसूयेने आपल्या पतीचे रूपांतर तीन बालकांत केल्याचे आढळून आले. देवभार्यांची ती शोचनीय अवस्था पाहून अनसूयेने क्षणार्धात त्रिदेवांना पुन्हा पूर्वरूप दिले. मग अनसूयेच्या सत्त्व साक्षात्काराने चकित झालेल्या त्रिदेवांनी पुढे यथावकाश तिच्या उदरी जन्म घेण्याचे मान्य केले.आपला पराभव मान्य करून ब्रह्मा महेश तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात निघून गेले. मग कालांतराने ब्रह्मा ‘चंद्र’ (सोम) झाले आणि महेश ‘दुर्वास’ झाले; परंतु विष्णु ‘दत्त’ रूपाने अत्रि व अनसूयेच्या इच्छेनुसार त्यांच्या आश्रमातच राहिले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे प्रतीक म्हणून त्याने ब्रह्माचा कमंडलू आणि महेशाचा शूल हातात धारण केला.
‘अत्रि’ म्हणजे तिन्ही नव्हे तो. असा हा परमात्मा त्रिगुणातीत आहे. सत्त्व, रज, तम या तीन गुणांच्या देवता अनुक्रमे विष्णु, ब्रह्मा व महेश मानल्या जातात. साधकाची ‘अनसूया’ म्हणजे अनन्य – एक ध्यानवृत्ती होते, त्रिगुणात्मक, त्रिदेवात्मक ही सृष्टी त्याचे बाळ होते. अत्रि म्हणजे त्रिगुण नाही तो आणि अनसूया म्हणजे जिच्या ठिकाणी दोषदृष्टी नाही ती. अशा अत्रि आणि अनसूयेपासून दत्तात्रेयांचा जन्म झाला. हा परमात्म्याचा साधक ज्यायोगे परमात्म्याशी एकरूप होतो ते साधन म्हणजे योग. आत्म्याचा परमात्म्याशी योग साधणे म्हणजे दत्तजन्म होय ! किंवा जेथे अत्रि व अनसूया या महाभावांचा संयोग होतो, तेथे दत्ततत्त्व प्रगट होते.
दत्तात्रेयांनी अत्रि ऋषींच्या आदेशानुसार गौतमी नदीच्या काठी शिवोपासना करून ‘योगसिद्धी’ आणि ‘ब्रह्मज्ञान’ प्राप्त केले. त्यांचा आश्रम सिंहाचलाजवळ प्रयाग वनात असून ते स्वेच्छाविहारी आहेत. माहूर हे पुरातन दत्तक्षेत्र दत्तात्रेयांचे शयनस्थान समजले जाते. ते पांचाळेश्वरी स्नान करतात आणि कोल्हापुरी भिक्षाटन करतात. एकनाथांनी एका अभंगात दत्तात्रेयांचे वर्णन करताना म्हटले आहे
“दत्त वसे औदुंबरी । त्रिशूल डमरू जटाधारी ॥
कामधेनू आणि श्वान । उभे शोभती समान ॥
गोदातीरी नित्य वस्ती । अंगी चर्चिली विभूती ॥
काखेमाजी शोभे झोळी । अर्धचंद्र वसे भाळी ॥
एका जनार्दनी दत्त । रात्रंदिन आठवीत ॥”
ब्रह्मा, विष्णू, महेशांचा समन्वय दाखविणारी तीन मुखे, सहा हात, वरच्या दोन हातांत शंख आणि चक्र (विष्णू द्योतक), मधल्या दोन हातांत डमरू आणि कमंडलू (शिवाचे द्योतक) आणि खालच्या दोन हातांत माला चर्चिलेली, पायी खडावा, व्याघ्रांबर परिधान केलेले आणि काखेत झोळी असलेले, मागे गाय आणि आसपास चार श्वान (कुत्री) असलेले दत्तात्रेयांचे ध्यान वाचकांना सुपरिचित आहे.
माहीती संकलन परम पूज्य - 🕉🌹 गुरूवर्य श्री अवधूत गुरूजी 🌹🕉

No comments:
Post a Comment