Tuesday, 9 June 2020

बोधकथा - पराभूत मानसिकता


⚜️बोधकथा - पराभूत मानसिकता⚜️

एकदा एका जंगलात एक ऋषी आश्रम उभारून राहत हाेते. त्यांच्याकडे महाकाय हत्ती हाेता. मात्र त्यास एका किरकाेळ दाेरीने बांधून ठेवले जायचे. एक वाटसरू या आश्रमाजवळून जात असताना हे दृश्य पाहून ताे विस्मित झाला. इतका महाकाय हत्ती एका साध्या दाेरीने बांधला गेला आहे आणि याउपरही स्वतंत्र हाेण्यासाठी ताे धडपडत नाही. खरे तर एखादा हत्ती साखळदंडदेखील ताेडू शकताे. त्याच्या मनात जिज्ञासा वाढली की, साधी दाेरी हा महाकाय हत्ती का ताेडू शकत नाही? हा वाटसरू मग ऋषींकडे गेला. त्या वेळी ते शिष्यांना अध्यापन करीत हाेते. वाटसरूने ऋषींना नमस्कार करून आपली जिज्ञासा प्रकट केली.
वाटसरूचा प्रश्न एेकून ऋषी म्हणाले, हा हत्ती जेव्हा खूपच लहान हाेता त्या वेळी माझ्याकडे आला. तेव्हा या साध्या दाेरीने त्याला बांधून ठेवायचाे. त्या वेळी जाेर लावूनदेखील ही दाेरी ताेडणे त्याला कठीण जात असे. तेव्हा हत्तीने ही दाेरी ताेडण्याचा अनेकदा जाेरकस प्रयत्न केले, परंतु अनेकदा ताे जखमी झाला. त्याच्या पायातून रक्त निघाले, परंतु ताे ही दाेरी ताेडू शकला नाही. बऱ्याच प्रयत्नानंतर त्याने आपला पराभव मान्य केला आणि नंतर त्याने दाेरीवर जाेर देण्याचेदेखील साेडून दिले. जसा ताे माेठा हाेत राहिला तसा त्याने प्रयत्न केला, परंतु ही दाेरी आपल्याकडून तुटणार नाही असे त्यास वाटायचे आणि दाेरी ताेडण्याचा त्याने कधी प्रयत्न केला नाही. आजही ताे या दाेरीत जखडून राहिला आहे.
खरे तर या हत्तीने पराभव मान्य केला आहे. वस्तुत: काेणत्याही क्षणी ही दाेरी ताेडून ताे स्वत:ला या बंधनातून मुक्त करू शकताे, परंतु बालपणीच्या पराभवाला आयुष्यभराचा पराभव मानून त्याने पुन्हा प्रयत्न करण्याचे साेडूनच दिले. या महाकाय हत्तीप्रमाणे आपल्या आसपास असे कितीतरी लाेक आहेत, जे स्वत:ला कमनशिबी म्हणवून घेतात, आयुष्यात कधीही यशस्वी बनू शकत नाही या भ्रमाला कवटाळून राहतात. कारण त्यांनी अगाेदर खूप प्रयत्न केलेले असतात, परंतु ते सारे प्रयत्न असफल ठरलेले असतात.

शिकवण :
 एखाद्या कामात अपयश आल्यानंतर ते अशक्य आहे, असे गृहीत धरून दुसऱ्यांदा त्याच्या मुळाशी आपण हात घालत नाहीत असे आपल्या आयुष्यात अनेकदा घडते. खरे तर आपल्या कार्यशैलीतील काही त्रुटी किंवा अन्य काही कारणे त्यामागे असू शकतात.

No comments:

Post a Comment