⚜️बोधकथा - भावना तसं फळ⚜️
कोणी एके काळी एका कुटुंबात दोन भाऊ होते. त्यांचे वडील रोज दारू पिऊन येऊन त्यांच्या आईला मारहाण करून घरात भांडण करत असत. कालांतराने ते दोघे भाऊ मोठे झाले. त्यातला एकजण जेमतेम शिकला. उनाडक्या करून जगू लागला. एकदा चोरी करताना पकडला गेला आणि त्यामुळे त्याला तुरुंगात जावे लागले. तर दुसरा भाऊ उच्च शिक्षण घेऊन मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर सन्मानाने नोकरी करू लागला. त्याच वेळेला एक पत्रकार कौटुंबिक व सामाजिक परिस्थितीचा मुलांच्या घरी भविष्यावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करत असताना तुरुंगात एका भावाला भेटला. त्याला त्याने विचारले, "महोदय, आपण न शिकता चोरी करताना कसे पकडले गेला?" यावर तो म्हणाला, "माझ्या घरातलं भांडणाचं अशांत वातावरण याला कारण आहे. सतत होणाऱ्या भांडणामुळे मला अभ्यासात अजिबात आवड वाटली नाही. त्यामुळे मी अनुचित मार्गाकडे वळून चोरी करताना पकडला गेलो." त्याने सांगितलेले कारण पटण्यासारखे होते. त्यानंतर तो पत्रकार दुसऱ्या मुलाकडे गेला. तोच प्रश्न त्यालाही विचारल्यावर तो म्हणाला,
"या साऱ्याचे श्रेय मी माझ्या वडिलांना देतो. कारण त्यांच्या व्यसनाधिन वागण्याने आम्हाला त्रास होत होता. म्हणून आमचं भविष्य अंधारात होतं. मी विचार करू लागलो की मला अशाप्रकारे जगायचं नाही. म्हणून मी मेहनत केली. खूप अभ्यास केला. उच्च शिक्षण पूर्ण करून मी माझं उद्दिष्ट गाठले.
" एकाच कुटुंबातल्या दोन वेगळे भविष्य घेऊन जगणाऱ्या दोन सख्ख्या भावांकडे बघून पत्रकाराला वाटलं, खरंच जशी ज्याची भावना तसं त्याचं त्याला फळ
शब्दांकन - डाॅ सुरेंद्र पिसाळ

No comments:
Post a Comment