Saturday 6 June 2020

श्री बिमलेश्वर मंदिर, संबलपूर ओडिशा


----------------------------
श्री बिमलेश्वर मंदिर
----------------------------

ओडिशा राज्यातील ऐतिहासिक संबलपूर शहर हे हिराकूड धरण आणि संबलपुरी साड्या यांंसाठी जगप्रसिद्ध आहे.
या शहरापासून २३ कि.मी. अंतरावरील श्री बिमलेश्वराचे मंदिर हे ‘झुकणारे मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. इटली देशातील पिसा येथील झुलता मनोरा पहाण्यासाठी अनेक भारतीय लाखो रुपये खर्च करून तेथे जातात; मात्र आपल्याच देशातील हे आश्चर्य प्रसिद्धीपासून अत्यंत दूर आहे.
बाहेरून नेहमीच्या मंदिर प्रांगणाप्रमाणे दिसणा-र्या वास्तूत  प्रवेश केला तर त्या प्रांगणातील श्री बिमलेश्वराच्या मुख्य मंदिरासह अन्य सर्व लहान मंदिरे, दीपमाळ, मंदिराची संरक्षक भिंत सर्वकाही विशिष्ट कोनात झुकल्याचे दिसतेे !
 या मंदिराविषयी पुजाऱ्यास विचारल्यावर त्यांनी सांगितले की, हेच या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी असूनही ते आपोआप झुकत आहे.

'महानदी’तील दैवी मासे'

त्यांना मंदिराचा इतिहास विचारला असता, त्यांनी सांगितले की, मंदिराच्या मागील बाजूस गेलो असता ३०० मीटर अंतरावर एक मोठा घाट आणि नावाप्रमाणेच महानदी असणार्या नदीचा प्रवाह दृष्टीस पडतो. घाटावरून उतरून नदीच्या पात्राजवळ गेल्यावर तांबूस-तपकिरी रंगाचे, वेगळ्याच प्रकारचे दैवी वाटणारे मासे मोठ्या संख्येने तेथे दिसते.
पुजारी ह्यांनी सांगितले की, ‘या माशांना देवाचे मासे म्हणून ओळखले जाते आणि कोणीही त्यांना पकडण्याचा, मारण्याचा प्रयत्न करत नाही’. पावसाळ्यात जेव्हा नदीचा प्रवाह मोठा होतो, तेव्हा हे मासे प्रवाहा सह न जाता, पाण्याखालून मंदिरापर्यंत एक गुहा आहे, तिच्यात जाऊन रहातात आणि कार्तिक महिन्यानंतर ते पुन्हा दिसू लागतात. त्या माशांना प्रसाद म्हणून लाडू खाऊ घातले जातात. तुम्ही पाण्यात हात घालून लाडू धरल्यास मासे येऊन तुमच्या हातातून लाडू घेऊन जातात !

मंदिराचा प्राचीन इतिहास
तेथे मंदिराचा इतिहास प्रसिद्ध करणारे एक शिक्षक श्री. क्षीरूद्र प्रधान मंदिराचा इतिहास सांगू लागले. श्री बिमलेश्वराचे सध्याचे मंदिर संबलपूर येथील चौहान वंशातील ५ वे राजे बलियारसिंग देव यांनी ख्रिस्ताब्द १६७० मध्ये बांधले. एक गोमाता कळपातून बाहेर पडून महानदीचे पात्र पोहत पार करून एका विशिष्ट ठिकाणी दुधाने अभिषेक करत असे. त्या ठिकाणी गुराख्याने शोध घेऊन खोदले असता श्री बिमलेश्वराचे दर्शन झाले. तो तेथे नित्यनेमाने पूजाअर्चा करू लागला. त्याला एके रात्री तेथील राजा बलराम देव हा दर्शनासाठी आल्याचा दृष्टान्त झाला. त्यानंतर ही वार्ता तेथील राजा बलराम देव याच्या कानावर पडली, त्याने संपूर्ण राजघराण्यासह तेथे येऊन दर्शन घेऊन पूजा केली. राजाला नदीकाठचा तो निसर्ग-परिसर खूपच आवडल्याने त्याने तेथे एक लहानसे मंदिर बांधले. पुढे त्याच वंशातल्या बलियारसिंग देव या राजाने सध्याचे मंदिर बांधले. काही इतिहासकारांच्या मतानुसार राजा अनंगभीम देव याने मुख्य दगडी मंदिराचे बांधकाम केले. मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाकडे जात असतांनाच अचानक मंदिर वायव्य दिशेने झुकले. सर्व जणांना याचे खूप आश्चार्य वाटले. बांधकाम पुन्हा करण्याचा विचार चालू असतांनाच राजाला श्री बिमलेश्वाराने स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले, मला या झुकलेल्या मंदिरातच वास्तव्य करण्यास आवडेल. त्यामुळे ते मंदिर तशाच झुकलेल्या स्थितीत आजही उभे आहे.
श्री बिमलेश्वराचे शिवलिंग हे पाताळलिंग म्हणून ओळखले जाते. या शिवलिंगाला वरच्या बाजूस पिंड नाही, तर मध्यभागी मोठी पोकळी आहे. त्या पोकळीत ५ फुटावर पाणी असून ते वर्षभर त्याच स्थितीत असते. नदीचे पात्र पिंडीपासून किमान २०-२५ फूट खाली आहे; मात्र त्या पाण्याच्या स्तराचा येथे काहीही परिणाम होत नाही. मंदिरातील पुजारी शिवलिंगाच्या पोकळीतील पाणी काढून प्रसाद म्हणून प्राशन करण्यास देतो.
------------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
------------------------------------------------

No comments:

Post a Comment