---------------------------------------------------
पूजेत पान सुपारी, ताम्हण, रांगोळी, अक्षता, पळी पंचपात्र, फुले, शंख, निरंजन तोरण ह्यांचे महत्व
----------------------------------------------------
१) देवपूजेचे वेळी देवापुढे नागवेलीची पाने व त्याच्यावर सुपारी ठेवण्याचा कुलाचार आहे. लग्न, मुंज आदी मंगलकार्यप्रसंगी देखील अतिथींना पान सुपारी देण्याची प्रथा आहे. नागवेलीच्या पानांना विड्याची पाने व पोफळी झाडाच्या फळाला सुपारी म्हणतात. देठासहित असलेले विड्याचे पान आपल्या हृदयाचे प्रतीक म्हणून समजले जाते. हे पान हिरवेगार असून मनाला अल्हाद देणारे असते. विड्याच्या पानाला त्यात सुपारी व कात टाकून तो विडा भोजनानंतर मुखशुध्दिसाठी खाल्ला जातो. कारण विडा हा वातहारक व जंतनाशक असतो.
२) सुपारी ही मांगल्याचे व प्रेमभावाचे प्रतीक मानले जाते. विशेष म्हणजे अखंड सुपारी ही गणपती देवाची प्रतिमा समजून तिची पूजा करतात. पत्निचे देहावसान झाले असता पती आपल्या कनवटीला सुपारी लावून धार्मिक कृत्य करतो. कारण सुपारी ही त्याची प्रतिधिनिक स्वरुपातील पत्नी मानली जाते. सुपारीचे अनेक प्रकार आहेत त्यांपैकी मसालेदार सुपारी ही सर्वांना आवडते. सुपारी चघळण्यामुळे लाळ रस उत्पन्न होतो
३) पूजेत तोरण घरामध्ये लग्न,मुंज असो किंवा वास्तुशांत वा धार्मिक कार्य असो. घराच्या दरवाज्याला तोरण बांधण्याचा कुळाचार पूर्वीपासून चालत आला आहे. एका सुतळीला सोनेरी नक्षीचे पताका सारखे कागद लावून त्याच्या मध्यभागी सोनेरी कागद चिटकवलेला नारळ असतो यालाच तोरण असे म्हणतात. आंब्याच्या डहाळ्यांचे किंवा पानाफुलांचेही तोरण शुभ म्हणून समजले जाते. दरवाज्याला तोरण बांधल्याने दृष्ट प्रवृत्तीचा वावर घरात होऊ शकत नाही. उलटपक्षी धार्मिक कार्ये यशस्विरीत्या पार पाडली जातात. आजकाल गणपतीच्या मंदीरात नारळाचे तोरण बांधल्यास गणपती नवसाला पावतो अशी श्रध्दा रुढ झाली आहे. नवर्यामुलाला व मुलीला त्यांच्या विवाह प्रसंगी बाशिंग बांधले जाते हे सुध्दा एक प्रकारचे तोरण असून त्यामुळे त्या दोघांना कुणाचीही दृष्ट लागत नाही अथवा बाधा येत नाही. तारण या शब्दाचा अपभ्रंश तोरण झाला असून तारण म्हणजे संकटापासून तारणे असा अर्थ गृहीत धरला जातो.
४) पूजेत पळी पंचपात्र पळी पंचपात्राला देवपूजेत आणि संध्येत महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. पळी ही तांब्याची अथवा पितळेची असते आणि तिच्या एका बाजूला छोटी वाटी व दुसर्या बाजूला नागफणी असते. नागफणी हे मांगल्याचे प्रतीक असून संध्या करताना जे आचमन केले जाते ते या वाटीतील जलाने करतात. पळी हा शब्द कालमापक पळे यापासून आला आहे. घड्याळाचा शोध लावण्यापूर्वी कालमापनासाठी घटीकापात्र वापरत असत त्यालाच पंचपात्र ही संज्ञा आहे. पंच याचा अर्थ मोठे असून मोठ्या तोंडाचे तांब्याचे वा पितळ्याचे भांडे म्हणजे पंचपात्र होय. हे उभट गोलाकार असून त्याचे कडेला छोटे काठ असतात.
५) पूजेत निरंजन निर म्हणजे नाही व अंजन म्हणजे मळ किंवा काजळी. निरांजनातील तुपाच्या ज्योतीवर काजळी किंवा धूर दिसत नाही. म्हणूनच त्याला निरंजन म्हणतात. निरंजन याचा अर्थ ओवाळणे असाही आहे.
६) देवाच्या पूजेची सांगता आरतीने होते. या आरतीमध्ये प्रज्वलित निरंजनाने देवाला ओवाळणे हा एक प्रमुख उपचार आहे. निरंजनाने देवाला ओवाळतात तेव्हा त्यात तुपात भिजवलेली वात असते तर स्त्री पुरुषाला ओवाळताना तेल वात असते तिला कुरवंडी असे म्हणतात. हा प्रकार म्हणजे औक्षण होय. औक्षण म्हणजे उत्तम क्षणांनी आयुष्याची वाढ व्हावी असा आशीर्वाद यात अभिप्रत असतो. सर्वसाधारणपणे निरंजनाला पाच पाळी असतात यात प्रामुख्याने कापसाच्या वातीने प्रज्वलित झालेल्या पंचारतीच्या निरंजनातील पाच ज्योती म्हणजे मानवी शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान, समान या पंचप्राणाची प्रतीके आहेत. देवाची आरती म्हणजे गायनातून केलेली देवाची स्तुती असल्यामुळे देवाची आपल्यावर कृपा होते.
७) पूजेत रांगोळी रंगवल्ली या संस्कृत शब्दापासून झालेले रुपांतर म्हणजे रांगोळी होय. भारतीयांचा कोणताही सण अथवा धार्मिक कार्य असो, दारापुढे रांगोळी काढण्याचा प्रघात पूर्वी पासून चालत आलेला आहे. रांगोळी काढल्यानंतर धार्मिक विधीला आरंभ होतो. दक्षिण भारतात अगदी रोज, तर बर्याच ठिकाणी सणासुदीला अंगणात अथवा दरवाज्यासमोर स्त्रिया रांगोळी काढतात. रांगोळी ही एक कला असून त्यासाठी निरनिराळ्या रंगांचा उपयोग केला जातो. फुलांची व धान्यांचीही रांगोळी काढली जाते. चैत्र महिन्यात अंगणात एक कोपरा शेणाने सारवून त्यावर विविध प्रकारच्या चिंन्हांनी रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू व फुले वाहतात. रांगोळी काढल्यामुळे आपल्या वास्तूत सतत लक्ष्मीचा प्रवेश होतो ही त्यामागील भावना असते.
८) पूजेत शंख सागरातून निर्माण झालेला शंख श्रीविष्णूने वध केलेल्या शंखचूड राक्षसाचे प्रतीक असून देवपूजेत याला मानाचे स्थान आहे. शंखाच्या मूलभागात चंद्र, कुक्षामद्ये वरुण, पृष्ठभागी प्रजापती आणि अग्रभागी गंगा व सरस्वती निवास करतात. पंचजन्य नाव असलेल्या शंखाला श्रीविष्णूने आपल्या हाती धरले आहे म्हणून शंखाला अग्रपूजेचा मान मिळाला असून त्याच्यामध्ये स्नान घालताना साठणारे जल सर्व देवांवर शिंपडण्यात येते. महाभारतातील युध्दप्रसंगी शंखाचा रणवाद्य म्हणून उपयोग केल्याचे आढळून येते तर देवपूजेच्या वेळीही शंखनाद केला जातो, ज्याच्या ध्वनीमुळे आजूबाजूचे वातावरण प्रसन्न होऊन एकाग्रता लाभते. म्हणून देवघरात शंख असणे भाग्याचे लक्षण आहे
९) पूजेत अक्षता सर्व धान्यामध्ये तांदुळाला महत्त्वाचे स्थान असून तांदुळापासून केलेला भात हे उदर भरणाचे साधन आहे. क्षत म्हणजे भोक पडणे. ज्या धान्याला भोक पडत नाही ते धान्य म्हणजे तांदूळ असून त्याला अक्षता म्हटले जाते. पूजेच्यावेळी देवांवर आणि लग्नप्रसंगी वधूवरांवर कुंकूमिश्रित अक्षता टाकल्या जातात. याचे कारण असे की देवाने आपल्यावर कृपा करावी व वधूवरांचे जीवन सुखी व्हावे हा त्यामागील हेतू असतो. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मूर्तीच्या खाली अक्षता ठेवूनच मूर्तीची स्थापना केली जाते. कारण मूर्तीचा क्षय होऊ नये. झोपताना उशीच्या खाली चारसहा अक्षता पुडीत बांधून ठेवल्यास झोप शांत लागते. अणि चित्त, मन व बुध्दी स्थिर राहुन त्याला बाधा येत नाही. ओंकाराच्या आज्ञेनुसार ब्रम्हदेवाने अक्षतांची निर्मिती केली त्यामुळे प्रसन्न होऊन सर्व मंगलकार्यात अक्षतांना प्राधान्य दिले जाईल असा वर ओंकाराने ब्रम्हाला दिला अशी कथा पुराणात असल्यामुळे अक्षतांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
१०) स्त्री-पुरुषांचे भाळी कुंकूम तिलकावरही अक्षता लावल्या जातात ज्यायोगे त्यांना प्रत्येक कार्यात यश प्राप्त व्हावे.
११) पूजेत फुले देवाच्या मुर्तीत प्राणप्रतिष्ठेच्या रुपाने मंत्रशक्तीचा वास असतो. यासाठी देवाच्या मस्तकावर वासाची फुले वाहिली जातात. मंत्रशक्तीचे उत्सर्जन त्या फुलांतून होत असते. देवांना फुले अतिशय प्रिय असतात. गणेशाला तांबडे फूल, शिवाला पांढरे फुल, विष्णूला पिवळे फूल आणि ब्रम्हाला कमळाचे फूल वाहण्याचा प्रघात आहे. फुलांचे हार करुन ते देवांच्या तसेच संत, महंत व विद्वानांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या गळ्यात घातले जातात. स्त्रिया आपल्या केसांच्या वेणीत फुलांचा गजरा करुन माळतात. फुलांपासून निरनिराळ्या प्रकारची अत्तरे बनवतात. त्या अत्तराचे थेंब कपड्यावर टाकल्यास त्यांच्या वासाने मन प्रसन्न होऊन शरीर उत्तेजित होते
१२)पूजेचे ताम्हण देवपूजा करण्यापूर्वी देवांना स्नान घालण्यासाठी तांबे किंवा पितळेचे जे पसरट भांडे वापरले जाते त्याला ताम्हण असे म्हणतात. ताम्हणाचा आकार गोल असल्यामुळे ते पृथ्वीचे प्रतीक समजले जाते. संध्येसाठी देखील ताम्हणाचा उपयोग केला जातो. कारण संध्या ही सुर्याची उपासना असून जी आचमने केली जातात त्याध्ये दैवी शक्ती निर्माण झालेली असते. ताम्हणात पडलेले शक्तिशाली जल पायदळी तुडवले जाऊ नये यासाठी ते झाडाच्या मुळाशी असलेल्या मातीत टाकले जाते कारण ते पवित्र मानले जाते
-----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
-----------------------------------------------
No comments:
Post a Comment