कोणे एके काळी एक राजा चित्रकलेचा खूप शौकीन होता. निसर्गरम्य चित्र काढण्यामध्ये त्याचा हातखंडा होता. त्यासाठी तो बऱ्याचदा निसर्गसानिध्यात जात असे. असाच एकदा तो पर्वतपठारावर आपली कलासामुग्री घेऊन चित्र काढण्यासाठी गेला होता. पर्वतामागच्या सुंदर देखाव्याचे नयनरम्य चित्र त्याने काढले होते. लांबून चित्र कसे दिसते आणि दूरवरून निसर्गामध्ये आणखी काय पाहायला मिळते का? या उत्सुकतेपोटी तो हळूहळू मागे जात निसर्गसौंदर्य अनुभवत होता. अशाप्रकारे मागे सरकत गेल्यावर नकळत तो खोल दरीच्या अगदी जवळ आला. त्याच्या सौंदर्यआस्वाद घेण्याच्या मग्नतेमुळे त्याला त्या गोष्टीचे अवधान राहिले नाही. एवढ्यात एका मेंढपाळाने ही धोक्याची गोष्ट हेरली. परंतु त्याक्षणी राजाचे लक्ष कसे विचलित करावे? ते त्याला कळेना. कारण तसे जर केले तर राजा क्रोधीत होण्याची शक्यता होती. म्हणून त्याने आपल्या हातातील काठी लांबूनच चित्रावर फेकली. हे पाहिल्यावर राजा मागे जायच्या ऐवजी तो पुढे गेला. तो संतापून मेंढपाळाला म्हणाला, "हे काय? मी एवढ्या मेहनतीने काढलेलं चित्र उडून गेलं. मेंढपाळ धावतच लांबून क्षमायाचना करत राजाजवळ आला. तो म्हणाला, "महाराज, माझा नाईलाज होता कारण तुम्ही एक पाऊल जर मागे सरकला असता तर मागे खोल दरी होती. मी या गोष्टीची कल्पना करू शकत नव्हतो की आपण त्या दरीत पडला तर काय होईल? म्हणून नाईलाजास्तव मला तुमचं लक्ष वेधण्यासाठी काठीचा वापर करावा लागला. आमचे राजे वाचले तर त्याहुन कितीतरी सुरेख चित्रे काढली जातील. यासाठी मी धावपळ केली. कृपया क्षमा असावी." वस्तुस्थितीचा अंदाज राजाला आल्यानंतर राजाने त्या मेंढपाळाला मोठ्या मनाने माफ केले आणि आपला जीव वाचवल्याबद्दल पारितोषिकही दिले.
शब्दांकन - डॉ सुरेंद्र पिसाळ

No comments:
Post a Comment