Tuesday, 9 June 2020

बोधकथा - संयम


⚜️बोधकथा - संयम⚜️

 एका जंगलात एक घोडा रहात असतो.
निरुपद्रवी,शांत,एकटा.एकदा एक लांडगा त्या जंगलात येतो आणि घोड्याच्या आयुष्यात उपद्रव सुरु करतो.त्याच्या खोड्या काढतो,त्याला सळो की पळो करून टाकतो. 

एक दिवस घोड्याला एक माणूस दिसतो.तो बंदुकधारी शिकारी असतो.घोड्याला वाटतं बंदुकीच्या एका गोळीत लांडग्याचा नाश करता येईल मग आपण शांत जगू शकू.घोडा माणसाजवळ जातो आणि त्याची समस्या सांगतो.

माणूस विचार करून म्हणतो,"माझ्या कडे बंदूक आहे पण लांडगा पळत असेल तर मी त्याचा पाठलाग कसा करू"? 

यावर घोडा म्हणतो "मी वेगाने पळू शकतो तू माझ्या पाठीवर बस आणि एकदाचा त्या लांडग्याला मारून टाक." 

शिकारी घोड्याला लगाम घालतो.त्याच्या पाठीवर बसतो.काही क्षणातच घोडा धावतो आणि शिकारी लांडग्याला ठार करतो. घोडा खूप खूष होतो,सुटलो एकदाचा म्हणत शिका-याचे आभार मानतो,पण शिकारी लगाम सोडायला तयार होत नाही म्हणतो,

"अरे तू तर माझ्या कामाचा आहेस मी आता तुला कधीच सोडणार नाही.” 

अशा प्रकारे घोडा शिका-याचा  कायमचा गुलाम होऊन जातो!

आपण आयुष्यात आपल्या समस्या सोडवताना ब-याचदा अविचारीपणा करतो ब-या वाईट परिणामाचा विचार न करता तात्पुरत्या उपाय योजना करतो त्यामुळे समस्या न सुटता अजून गुंता होतो.

दुःखात आपण कशाचा आधार घेतो ते शंभर वेळा तपासा कारण प्रश्न सोडवताना कधी कधी डाव उलटतो आणि घोड्या सारखी स्थिती होते.

संकटकाळात, दुःखाच्या,क्रोधाच्या प्रसंगी संयम ठेऊन निर्णय घेतले तर पश्चातापाची वेळ येत नाही,संयमाचे फळ सकारात्मकच मिळते.

ही गोष्ट एकदा जरी आठवली तरी थोडा थांबून विचार करा, घाईत घेतलेले निर्णय नकारात्मक सिद्ध होतात तर सर्व बाजूंनी साधकबाधक विचार करून संयमाने घेतलेले निर्णय सकारात्मक सिध्द होतात.

No comments:

Post a Comment