गोकर्ण महाबळेश्वर ( ಗೋಕರ್ಣ ಮಹಾಬಲೇಶ್ವರ )
कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण हे सुंदर शहर सुंदर समुद्रकिनारे आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर मंदिर, हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. राज्यातील हे प्राचीन मंदिर यात्रेकरूंमध्ये विशेषतः पौराणिक आख्यायिका आणि त्यासंबंधित इतिहासासाठी आदरणीय स्थान आहे. हिंदू मंदिरात रामायण आणि महाभारत या नावांचा उल्लेख आढळतो. हे मंदिर उत्तर भारतातील काशी या तीर्थक्षेत्राप्रमाणेच पवित्र असल्याचे मानले गेले आहे म्हणूनच दक्षिण काशी (दक्षिणेकडील काशी) असेही म्हणतात.
गुरुचरित्रांत अध्याय ६ मध्ये याची विस्तृत कथा आलेली आहे. रावणाची माता 'कैकया' शिवभक्त होती नित्य शिवलिंग पूजन केल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसे. एकेदिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग सापडेना आपला व्रतभंग होऊ नये म्हणून मातीचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली. त्यावेळी तिचा पुत्र रावण आईच्या दर्शनाला येतो आणि म्हणतो " तू कोणाची पूजा कशासाठी करते?" मग कैकया म्हणाली "शिवलिंगाची पूजा केल्यास कैलासपद प्राप्त होते." तेव्हा रावण म्हणाला "मी तुझा पराक्रमी पुत्र असून मृत्तिकेच्या शिवलिंगाची पूजा कशाला करते. मी तुला कैलास पर्वतच आणून देतो." असे म्हणून त्वरित सुंदर शुभ्र कैलास पर्वताजवळ आला. आपल्या वीस हातांचा जोर लावून कैलास पर्वत उपटू लागला शेवटी आपल्या दहा शिरांचा जोर लावून पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला. सर्व देवगण भयभीत झाले पार्वती माता श्री शंकरांना जाऊन विचारू लागतात. शिवशंकर म्हणतात "चिंता करू नकोस रावण माझा भक्त आहे आणि भक्तीने खेळत आहे." पार्वती माता सर्वांचे रक्षण करावे अशी विनंती करतात. तेव्हा शिवशंकरानी डाव्या हाताने कैलासाला दाब दिला आणि त्यात रावणाची दहा मस्तके व वीस भुजा पर्वत आणि जमिनीच्या सांध्यात अडकतात. रावण भक्तीने विनवू लागला आणि या संकटातून सोडवण्याची प्रार्थना करू लागला. शिवशंकरानी यातून सुटका केली तेव्हा रावण म्हणाला " मी कैलास पर्वत लंकेला घेऊन जायला आलो आहे कारण शिवशंकराची नित्य पूजा करावी असा माझ्या मातेचा संकल्प आहे." तेव्हा शिवशंकर म्हणाले " जर एवढे पूजेचे अगत्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलास? मी तुला माझे आत्मलिंग देतो. तुझ्या मनातील वासना पूर्ण करेल असे आत्मलिंग असून माझा प्राण आहे. ज्याच्या जवळ हे आत्मलिंग असेल त्याला मृत्यू नाही याच्या दर्शनाने सर्व दोष दूर होतात. परंतु हे तुझ्या नगरात घेऊन जा वाटेत कुठे नकोस तुझ्या नगरीत गेल्यावर तीन वर्ष याची पूजा कर म्हणजे तुला ईश्वरपद प्राप्त होईल.
देवर्षी नारदांना हे समजताच ते इंद्राकडे येतात रावण यामुळे अमर होणार यावर उपाय सर्व ब्रह्मदेवाकडे जाऊन वैकुंठी श्री विष्णूंकडे जातात. सगळे मिळून शिवशंकरांकडे येतात यावर शिवशंकर म्हणतात " रावणाच्या भक्तीने आम्ही प्रसन्न झालो विसर पडून आत्मलिंग दिले." श्रीविष्णू म्हणाले "रावणाला आत्मलिंग देऊन आपण अमरत्व दिले यामुळे दैत्य उन्मत्त होतील." यावर उपाय नारदांनी विघ्नहर्ता श्रीगणेशाला बोलावले.
रावणाला स्नान संध्या वेळेवर करण्याची सवय होती. श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य झाकून टाकला श्रीगणेश बालब्रह्मचारी रूपात गेले त्यांना बघून रावणाने विचारपूस केली. आता संध्या करायची वेळ झाल्याने रावणाने आत्मलिंग खाली ठेवता येत नसल्याने तिथे असलेल्या त्या बालब्रह्मचारीला (श्रीगणेश) विश्वासात घेऊन शिवलिंग हातात धरून ठेवण्यास सांगितले. श्रीगणेशाने विनंती मान्य करून "मी बालक आहे मला हे शिवलिंग फार काळ हातात घेऊन उभे राहता येणार नाही. माझे हात दुखायला लागले की मी तुला तीन वेळा हाक मारीन. तरी तू आलास नाहीस तर आत्मलिंग खाली ठेवून देईल." रावण अर्ध्य देत असताना गणेशाने हाक मारण्यास सुरुवात केली परंतु रावणाने ध्यान करीत असल्याने हाक मारूनही आला नाही. शेवटी बालब्रह्मचारी (श्रीगणेश) सर्व देवांना साक्षी मानून आत्मलिंग जमिनीवर ठेवले. हे समजताच रावणाने गणेशास मारायला सुरुवात केली मी माझ्या वडिलांना सांगतो असे म्हणून बालक निघून गेला. रावणाने अतिशय बळाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला ते भूमीसहीत हलायचे बळ लावूनही उचलले गेले नाही परंतु गोकर्णासारखे लांब झाले. म्हणून या लिंगाला 'गोकर्ण महाबळेश्वर' असे म्हणतात आणि पुढे तसे प्रख्यात झाले.
साभार धन्यवाद - © श्रीगुरुशरणं
No comments:
Post a Comment