वीरांना आव्हान देणारे बाहुबल, धनाढ्याना चढाओढीसाठी प्रवृत्त करणारे ऐश्वर्य, पंडितांना समोर नामोहरम करण्यास उत्सुक असे पांडित्य आणि मदन या शब्दाने अलंकृत होण्यास अनुकूल असे सौंदर्य हे कधीही नित्य राहत नाही. हा देहच जर क्षणभंगुर असेल तर हे सर्व कुठून कायम होणार? पण मग वृथा अभिमान बाळगून नित्य आव्हानात्मक वर्तन असणे कशाचे प्रतीक आहे?
हे सर्व अविद्येचे प्रतीक आहे. विद्या म्हणजे केवळ पदवी किंवा उपाधी नव्हे तर या जन्माची इतिकर्तव्यता कशात आहे हे समजणे म्हणजे योग्य विद्या प्राप्त होणे. काय केले असता या सर्वांची प्राप्ती होईल यावर दत्त महाराज (दत्त माहात्म्यात) म्हणतात, माझ्या भक्ता काय न्यून ll माझा जो भक्त आहे त्याला या जगात काहीही दुर्लभ नाही.
इतर सर्वाना जरी या सर्व गोष्टी वेगवेगळ्या भासत असल्या तरी दत्त भक्तांना हे सर्व प्राप्त करण्यास केवळ दत्त भक्ती पुरेशी आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कार्तवीर्य सहस्त्रार्जुन. केवळ दत्त महाराजांच्या कृपाप्रसादाने सर्व इच्छित प्राप्ती झाली. सहस्त्र बाहू असावे इच्छिता ll या वराने बाहुबल, अक्षय्य द्रव्य असावे भांडारी ll या वराने कायम ऐश्वर्य, नित्य सत्संगतीने विनम्र पांडित्य, आणि दत्त महाराजांच्या उपासनेने अत्यंत तेजस्वी असा देह प्राप्त झाला. पण असे सर्व जरी प्राप्त होत असले तरी नित्य दत्त भक्तीची जोड लाभल्याने सोबत वैराग्य देखील आलेच. या वैराग्याने आव्हानात्मक वर्तन कधीही होत नाही कारण या सर्वांची नश्वरता ज्ञात असते. हि नश्वरता ज्ञात असणे म्हणजेच ज्ञान होणे.
दत्त महाराज हे सर्व भोग भोगण्याचे स्वातंत्र्य भक्तांना अवश्य देतात पण या स्वातंत्र्याचा लाभ भक्त कधीही उठवीत नाहीत. काय म्हणणे आहे भक्तांचे तर तुझे सान्निध्य नित्य मिळणे, जन्मोजन्मी मिळणे हे आमच्या आजतागायतच्या भक्तीचे फळ आहे. स्वर्ग नको, त्यातील उत्तमोत्तम भोग नकोत, देवलोकीचे जन्म नकोत, केवळ तुझ्या सान्निध्यात राहु द्यावेस हे पुरेसे आहे. अमृतापेक्षा देखील तुझ्या कथा आम्हाला प्रिय आहेत, त्यांचे कीर्तन ऐकावयास मिळावे, तुझ्या लीलांचे गुणगान व्हावे, हेच आमचे स्वर्गसुख. श्री गुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य
No comments:
Post a Comment