महान भक्तांच्या किंवा अवतारी सत्पुरुषांच्या परस्पर भेटी हा सर्वसामान्यांचा नेहेमीच उत्सुकतेचा ,कुतूहलाचा विषय राहिला आहे . अनेक भेटी या जागी उदाहरणास्तव घेता येतील . थोरले महाराज आणि गजानन महाराज यांची भेट ,नारायण स्वामी महाराज आणि मिरजेचे सत्पुरुष मिरासाहेब यांची भेट . आता सामान्यांची उत्सुकता काय असेल तर हि अवतारी सत्पुरुष मंडळी कशी भेट घेत असतील ,परस्पर संभाषण काय होत असेल वगैरे वगैरे .
अशाच एका भेटीचा संदर्भ आज एका हस्तलिखितात मिळाला . हे हस्तलिखित आहे एकनाथ महाराजांच्या चरित्राचे . या हस्तलिखित चरित्रात दोन महान दत्त भक्तांच्या भेटीचा आलेला उल्लेख म्हणजे एकनाथ महाराज आणि दासोपंत यांची झालेली भेट . एकनाथ महाराज आणि दासोपंत हे दोघेही महान दत्त भक्त , दोघांनाही दत्त महाराजांचे सगुण साक्षात दर्शन झालेले . पण मग हि भेट कुठे आणि कशी झाली ?
एकनाथ महाराज काशीहून पैठणला परत येत असताना अंबेजोगाई मार्गे जाणार होते . त्यांच्या आगमनाची बातमी दासोपंतांना मिळाली . दासोपंत हे दर्शन आणि भेटीसाठी खूपच उत्सुक होते .ऐकोनि चित्ती संतोषला ll असे या प्रसंगाचे वर्णन आहे . इकडे जाताना या स्थानी दासोपंतांची भेट होणार म्हणून एकनाथ महाराज देखील आतुर होते . दासोपंतांच्या तीस वर्षांच्या दत्त महाराजांच्या उपासनेविषयी आणि कडकडीत वैराग्याविषयी एकनाथ महाराज जाणून होते .
अंबेजोगाईच्या वेशीवर दासोपंत स्वतः एकनाथ महाराजांच्या स्वागतार्थ उभे होते . एकनाथ महाराज आले आणि दासोपंतांनी महाराजांना आलिंगन देऊन स्वागत केले . नमुनी आलिंगन देती l सुखासी सुख उचललेती l कुशळ वीच्यारीती (विचारिती ) परस्परे ll असे या प्रसंगाचे वर्णन आहे . एक दुसऱ्याचे क्षेम कुशल विचारत जणू सुखाने सुखाला आलिंगन दिले आहे . सत्कारपूर्वक एकनाथ महाराजांना दासोपंतांनी आपल्या घरी आणले . काही दिवस एकनाथ महाराजांच्या सहवासाची संधी दासोपंतांना मिळाली किंवा काही दिवस दासोपंतांच्या सहवासाची संधी एकनाथ महाराजांना मिळाली . दोन्ही दत्त स्वरूपे तेव्हा काय म्हणावे ? मात्र दासोपंतांची परिपूर्ण स्थिती एकनाथ महाराजांनी पाहिली आणि त्यांच्या मनाचे पूर्ण समाधान झाले . काही दिवस राहून दासोपंतांचा निरोप घेऊन एकनाथ महाराज निघाले तेव्हा दासोपंत वेशीपर्यंत सोबत पायी आले .या वेळी एकनाथ महाराजांनी दासोपंतांना एकदा तरी जन्माष्टमी उत्सवासाठी प्रतिष्ठान नगरी (पैठण ) यावे असे आग्रहाचे आमंत्रण दिले .
हे चरित्र केशवकृत आहे ,चरित्रात अध्याय पद्धती असून हे ओवीबद्ध आहे .यावर शके १७९२ प्रमोद नाम संवत्सरे असा उल्लेख आहे . श्री गुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य
No comments:
Post a Comment