Tuesday, 2 June 2020

दत्त दर्शन आणि गुरुप्रसाद!


**************************
दत्त दर्शन आणि गुरुप्रसाद!
**************************

आपल्या संपूर्ण भारत देशात, राज्या राज्याच्या  कणाकणात दत्त संप्रदाय हा मोठ्या प्रमाणात विस्तारित झाला आहे . महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्यात प्रमुख दत्त क्षेत्र आहेत. 
अन्नपूर्णेची झोळी घेऊन फिरणाऱ्या त्या परमात्म्याच्या दारातून कोणी उपाशी पोटी जाणार नाही ह्याची दक्षता  ते स्वतः घेतात हे खरे आहे. 
म्हणूनच प्रत्येक क्षेत्राशेजारी अन्नछत्राची स्थापना केली आहे. 
बरं आता ह्या विषय सुरु केलाच आहे
तर मग लेखणी त्या दिशेलाच वळवतो. 
क्षेत्रा क्षेत्राने खाण्याची चव, पदार्थ, मसाले बदलतात आता हे विधान केवळ भोजनालयांपुरते किंवा होटेलांपुरते मर्यादित आहे का ? तर नाही. 
कोणत्याही दत्त मंदिरात गेलं, दर्शन घेतलं की काही माणसं उदर भरणासाठी होटलं शेधतात.
" अरे! कशाला ", महाराजांकडे आलात ना? मग ते बघतील ना काय ते. " 
माझे मुळ गाव म्हणजे माणगाव, त्याच्यापासूनच आपण सुरू करु. 
ताट पुढे आलं की केवळ बघत जायचे, आकाशातून सुरेख असे दवबिंदू पडावे असे मनमोहक पदार्थ ताटात हजेरी लावतात. 
कोकणात आलोय म्हणजे भात हा ताटात आणि मग पोटात गेलाच पाहिजे, तो एकटाच का जाईल ह्या विचाराने घट्ट अशी खोबऱ्याची डाळही मागेमागे येते, ह्या सगळ्याला जोड म्हणून ताटात कोबीची किंवा वांग बटाट्याची भाजीही असतेच. 
सगळ काही मटकवल्यावर "कोकणकन्या" म्हणून प्रसिद्ध असलेली सोलकढी पाण्याची जागा भरते. महाराजांकडे आलात ना मग गोड न खाताच जाणार का असा प्रश्न विचारत गव्हाचा शिरा ( सांजा) ताटात उडी मारतो. ही मेजवानी अगदी सुटसुटीत आणि पचायला हलकी अशी असते. शेवटी कोकणी माणसाचं खाण आहे ते. 
आता वळुयात पिठापुरा  कुरवपुर आणि गाणगापूराडे.  मुद्दामच ही क्षेत्र मध्ये घातली कारण ह्या क्षेत्रातील नैवेद्य संस्कृतीत थोडे साम्य आढळते. हे ताट आहे केळीच्या पानाचं , पुष्कळ अशा भाताने निम्मं भरलेलं . भातावर फोडणी दिलेल्या तडतडत्या कडीपत्ता, मोहरी, लाल मिरचींने भरलेल्या सांबाराचे आगमन झाल्यावर , पानावर बसलेल्या भक्ताचे हात आपसुकच भातात जातात. कुरवपुरात तर गरम कोरड्या भातावर आधी तुप ओतायची पद्धत आहे. हा भात गरम गरम वाढण्यासाठी साधकांची धडपड सुरू असते. गोड पदार्थ म्हणून तयार केलेला तुपाचा बेसनाचा लाडू समोर येतो.  तो तोंडात टाकून , तृप्ततेजा ढेकर देणारा स्वर्गीय सुखापेक्षा  किती तरी जास्त पटीने सुख अनुभवता येत. 
गाणगापूरात तर माधुकरीची प्रथा अजूनही चालू आहे. ह्या अलौकिक प्रथेत, साधकांचा आणि सेवेकऱ्यांचा सदगुरू प्रति असलेला दृढ़ विश्वास सढळ रित्या जाणवतो. पाच सहा पसरट हिरव्यागार पानावर पडणारी खाद्यपदार्थाची मूठ सदगुरुंची जन्मोजन्मी पुरणारी वात्सल्याची शिदोरीच आहे! 
गाणगापुरास जाणारे लोक हमखास अक्कलकोट चुकवत नाही. गाणगापुरास सकाळी गेल्यावर दुपारी अक्कलकोट आगमन होते. त्यामुळे "आदि पोटोबा आणि मग विठोबा " ह्या विचाराने डोळे आपसुकच " श्री स्वामी समर्थ अन्नछत्र " हा फलक शोधतात. हा नैवेद्य कसा वर्णनावा? पोळीची किंवा भाकरीची एखादी चौकोर, गरम भात, तिखट अथवा गोड डाळ, कोपऱ्यात लोणच्याची फोड, शीतल ताक , कोमट पाणी आणि नजरेसमोर स्वामींची भव्य तसबीर. असा हा सुधा रस प्राशन करताच स्वामींचे साक्षात दर्शनच झाले हा विचार मनाला भिडतो . 
पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश करताच दत्तप्रेमींच्या डोळ्यासमोर उभी ठाकते ती म्हणजे " नृसिंहवाडी " 
ह्या क्षेत्री आल्यावर का कोण जाणे पण सामान्यातील सामान्य व्कतिस आपण दत्त भक्तीचे परमोच्च शिखर गाठले आहे ही भावना मनात येते. तशीच इकडची प्रसाद संस्कृती. आपले अष्टसात्विक भाव प्रज्वलित होऊन चंचल मनास स्थिरतेचे आणि आत्मविश्वासाचे कुंपण घातले जाते. भल्यामोठ्या अशा पात्रात बादलीच्या बादली मसाले, हळद, तेल, तुप सोडत असतात. भल्यामोठ्या चमच्याने ती डाळ अथवा आमटी हळूहळू ढवळून काढतात. ईकडे श्रींच्या मनोहर पादुकांची षोडशोपचार पुजा संपन्न झाल्यावर अन्नछत्रा समेर  मोठी रांग लागते. महाराजांचा हा अलौकिक प्रसाद भाविक तृप्त मनाने ग्रहण करतात. ती अवीट चव, तो अदभुत सुगंध , तो दत्त नामाचा जयजयकार, तो निसर्गरम्य परिसर पाहून मनुष्याचे कान, नाक, डोळे आणि क्षुधा धन्य धन्य होतात. 
गाडीस वेगळे वळण देऊन आपण पोहचतो गुरुमाऊलींच्या जन्मस्थानी, वाशिम ,लाड कारंज्याला. वऱ्हाडी ठसक्याची चव ह्या क्षेत्री ठोसपणे अनुभवायला मिळते, दुथडी भरून वाहणारे डाळीवरचे तेल, तुपात माखलेला शिरा, लाडू, लापशी, सांबारवडी ( कोथिंबीर वडी) , तेलाच्या तवंगात न्हाऊन निघालेली रस्सा भाजी . हे सर्व पदार्थ जरी पचायला जड असले तरी सुद्धा आपल्या गुरुमाऊलींच्या साठी एक दिवस डायट, पथ्य पाण्याला गोळी मारायला काय हरकत आहे? 
आता जरा महाराष्ट्राच्या बाहेर पडू, गुजराती थाली खाण्यासाठी काठियावाडी होटेलां बाहेर रांग लावणाऱ्यां साठी गरुडेश्र्वर, नारेश्र्वर आणि गिरनार दर्शन म्हणजे सुवर्णमेजवानी! 
नर्मदा मैय्याचा शांत काठ, नागचाफ्याच्या झाडांचा अलगत झुळझुळाट ह्या सगळ्यात गुरुभोजनाचा महिमा अगम्य आहे . ताटात असलेली गोड शेवटमाटर भाजी, गोड रस्सा भाजी, गोड डाळ आणि ज्वारीच्या रोटल्याची चौकार आणि ह्या सगळ्यावर, सगळ्याला पुर्ण करणारे फेसाळते मोत्यालाही लाजवेल असे छास!! 
गिरनार चढून गुरुशिखरा पर्यंत पोहचणेच हीच एक शारीरिक व मानसिक कसोटी आहे, त्यामुळे वर आल्यावर आपला भक्त उपाशी पोटी खाली जाऊ नये म्हणून हे कनवाळू दत्त महराज गोड असा गव्हाचा शिरा देतात!आता मला सांगा गरुडा सारखे उंच झेप घेणारे गुरुशिखर चढल्यावर हावरटा सारखा शिरा खाला म्हणून काही चुकीचे केल्यासारखे आहे का? अहो आपलीच आई आहे ती!! काहीही नाही बोलणार शेवटी आपलं बाळ किती भुकेलं आहे हे केवळ आपल्या आईलाच कळत. 
तात्पर्य काय तर, खरोखरच प्रत्येकांनीच अनुभवावी अशी हि विलक्षण ,अविस्मरणीय पदोपदी अन्नपूर्णेचे दर्शन घडवणारी यात्रा, हे सिद्ध करते की आपले आराध्य जरी काखेत झोळी घेऊन विराजमान असले तरी सुद्धा त्यांच्या दरबारी अखंड आणि अमर्यादित अशी क्षुधा शांत करणारी अन्नपूर्णा आहे
**************************
सुनंदन कृष्णराव राऊळ 
मुंबई गोरेगाव 
२१/०५/२०२०
_________________________
*सुचना*:-
*कृपया आपण शेअर करतांना नाव न बदलता याच नांवाने शेअर करणे*🙏🏻💐

No comments:

Post a Comment