---------------------------------------
देशाचा मध्यबिंदू झिरो माईल स्तंभ, नागपूर
------------------------------------------
ब्रिटिशांनी नाव दिलेला तोच हा झिरो माईल स्टोन म्हणून शून्य मैलाचा दगड होय.
या ठिकाणी एक स्तंभ आणि एका ठिकाणाहून चारही दिशांचे प्रतीक म्हणून चार धावत्या घोड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. वाळूच्या दगडांनी याची निर्मिती करण्यात आल्याचे आणि चार घोडे राजस्थानहून आणण्यात आल्याचे सांगण्यात येते.
या झिरो माईलची कथासुद्धा मजेदार अशीच आहे. १७६७ मध्ये देशाचा नकाशा तयार करण्यासाठी ब्रिटिशांनी ट्रिग्नोमॅट्रिक सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली होती. या विभागाच्या मार्फत त्यांनी देशात दळणवळणासाठी रस्ते बांधण्याचे काम हाती घेतले होते. देशाचा नकाशा तयार करण्याची जबाबदारी विल्यम लॅम्टन या सैन्य अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली. विशेष म्हणजे त्यावेळी सध्याचे पाकिस्तान आणि बांग्लादेशही भारताचाच भाग होता व त्यानुसार नागपूर हे मध्यवर्ती केंद्रबिंदू होते. त्यानुसार नकाशाचे काम सुरू झाले. मात्र हे काम सुरू असताना वाटेत वर्ध्याजवळ लॅम्टनचा मृत्यू झाला. त्यामुळे नकाशा तयार करण्याचे काम रखडले. हे काम जवळजवळ थंडबस्त्यात गेले.
तब्बल ८४ वर्षांनी म्हणजे १९०७ साली पुन्हा नकाशा तयार करण्याचे काम सुरू झाले. त्याअंतर्गत सीताबर्डी किल्ल्याच्या पायथ्याशी झिरो माईल स्टोन उभारण्यात आला होता. ट्रिग्नोमॅट्रिक सर्व्हेनुसार या झिरो माईल स्तंभाची उंची समुद्र सपाटीपासून १०२०.१७१ फूट इतकी आखण्यात आली होती. हा नकाशा तयार करण्यात आल्यानंतर जवळजवळ १९४७ ला भारताच्या फाळणीपर्यंत याच ठिकाणाह१९४७ ला भारताच्या फाळणीपर्यंत याच ठिकाणाहून देशातील शहराचे अंतर मोजले जायचे. पुढे पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर जबलपूरजवळ भारताचा मध्यबिंदू निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.
वर्तमान काळात उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने कुठलेही अंतर सहज मोजले जाऊ शकते. मात्र त्याकाळात हे कठीण काम झिरो माईलजवळून करण्यात आले. या स्तंभावर देशातील आठ शहरांची लांबी मैलाच्या स्वरूपात उल्लेखित आहे. नागपूर शहर मध्यवर्ती आहे किंवा नाही हा चर्चेचा मुद्दा असू शकतो, मात्र झिरो माईल स्तंभाचे ऐतिहासिक महत्त्व नाकारता येत नाही. १०० वर्षाचा इतिहास या या स्तंभाच्या माध्यमातून चिन्हांकित झाला आहे, म्हणून तो ऐतिहासिक वारसा जोपासण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे.
माहिती संदर्भ :-लोकमत
----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
------------------------------------------------
No comments:
Post a Comment