---------------------
जगन्नाथ मंदिर
----------------------
(उडिया: ଜଗନ୍ନାଥ ମନ୍ଦିର୍)
मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबळभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत.
हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. जगन्नाथ देव हा विष्णूचा एक अवतार मानला जातो.असे म्हटले जाते की या मंदिराची उभारणी राजा अनन्गभिमादेवा याने केली आहे.
जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात होते. त्यावेळी मूर्ती विराजमान झालेला प्रचंड वजनाचा लाकडी रथ ओढायला शेकडो माणसे लागतात.
रहस्यमय जगन्नाथ पुरी
जगातली सर्वात मोठी रथयात्रा पुरीमध्ये भरते. पंढरपूरपेक्षा खूप अधिक भक्त ईथे एकत्र येतात. पुरीचे आणि इथल्या जगन्नाथाचे न उलगडलेले रहस्य आणि
भक्तांची श्रद्धा:-
जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा पारध्याचा बाण लागून मृत्यू झाला तेव्हा पांडवांनी त्यांचे शरीर शोधून त्याचा दाहसंस्कार केला. इतर सर्व शरीर जळून गेले पण हृदय जळतच राहिले. नंतर तो पिंड नदीच्या पाण्यात सोडण्यात आला. त्या पिंडाचा त्या जळत्या हृदयामुळे एक लगदा तयार झाला. राजा इंद्रद्युम्न याला तो लगदा मिळाला, त्याने तो लगदा भगवान जगन्नाथाची मूर्ती तयार करून त्यात ठेवला आणि मंदिरात स्थापन केला.
दर १२ वर्षांनी भगवान जगन्नाथाची मूर्ती बदलली जाते, परंतु मूर्तीच्या आतील तो लगदा आजपर्यंत कोणीही पहिला नाही. जे पुजारी मूर्ती बदलतात त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते आणि हात सुद्धा कापडाने गुंडाळले जातात. त्यामुळे आजपर्यंत कोणीही त्या लगद्याला पाहू शकला नाही किंवा त्याचा स्पर्श अनुभवू शकला नाही!
असे म्हटले जाते कि भगवंताच्या हृदयाच्या लगद्याला जो कोणी पहिल त्याचा तात्काळ मृत्यू होईल कारण त्या हृदयात ब्रह्मदेव आहे आणि प्रचंड तेज आहे जे कोणीही सहन करू शकणार नाही.
ज्या दिवशी जगन्नाथाची मूर्ती बदलली जाणार असते त्यादिवशी सरकारकडून संपूर्ण पुरी शहरात वीज बंद करून अंधार केला जातो. 'मूर्तीत श्रीकृष्णाच्या हृदयाचा लगदा आहे का?
हि बाब एक रहस्यच आहे!
-------------------------------------------
जगन्नाथाच्या मंदिराबाबत रहस्ये
--------------------------------------------
१) भगवान जगन्नाथाच्या मंदिरावरील ध्वज नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेला फडकतो, म्हणजे हवा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असेल तर झेंडा पश्चिमेकडून पूर्वेकडे फडकतो, असे का होते, हे शास्त्रज्ञ पण सांगू शकले नाहीत!
२) मंदिराच्या कळसाच्या ठिकाणी असलेले सुदर्शन चक्र पुरीमध्ये कुठेही उभा राहून पाहता येते आणि कुठूनही पहिले तरी असेच वाटणार कि हे सुदर्शन चक्र आपल्या समोरच आहे!
३) सर्वत्र पहिले तर असे आढळून येते की, दिवसा वारे समुद्राकडून जमिनीकडे येतात आणि रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहतात पण पुरी याला अपवाद आहे, इथे नेमकं याच्या उलटे होते दिवसा वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात!
४) भारतातल्या बहुतेक सर्व मंदिरांच्या शिखरांवर पक्षी बसलेले दिसून येतात परंतु जगन्नाथाच्या मंदिराच्या आजवरच्या इतिहासात एकही पक्षी मंदिर शिखर परिसरात फिरकला नाही!
५) मंदिराच्या सिंहद्वारातून आत प्रवेश करताच समुद्राचा आवाज येणे पूर्णपणे बंद होतो. मात्र संपूर्ण पुरीमध्ये अन्य कुठेही जा, समुद्राचा आवाज येतच असतो!
६) अन्य बहुतांश मंदिरात श्रीकृष्ण आपल्या पत्नीसमवेत विराजमान असतात पण या मंदिरात मात्र ते आपले भाऊ बळराम आणि बहीण सुभद्रे सहित विराजमान आहेत!
७) मंदिराच्या शिखराची उंची २१४ फूट आहे मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिवसाच्या कोणत्याही क्षणी त्याची सावलीच कुठे पडत नाही!
आज पर्यंत ह्या रहस्यांची उत्तरे कोणतेही शास्त्र वा शास्त्रज्ञ देऊ शकलेले नाहीत.
जेष्ठ महिन्याची पौर्णिमा ते आमावस्या या १५ दिवसांच्या काळात भगवान जगन्नाथ आजारी असतात असे मानले जाते. या कालावधीत एका लहान मुलाप्रमाणे त्यांच्यावर उपचार केले जातात. त्याला अंसारा असे म्हटले जाते. आषाढ शुद्ध प्रतिपदेतला भगवान आजारपणातून बरे होतात आणि द्वितीयेला गुंडीचा मंदिरापर्यंत रथयात्रा काढली जाते.
----------------------------------------------
जगन्नाथ मंदिराबद्दलच्या इतर चमत्कारीक गोष्टी
------------------------------------------------
१) मंदिरातील स्वयंपाकघर
हे जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर मानले जाते. इथे एक वर्ष पुरेल इतका अन्नसाठा ठेवला जातो. त्यामुळे इथे कितीही भक्त आले तरी त्यांच्यासाठी अन्न अपुरे पडत नाही.
२) जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती
जगन्नाथ रथयात्रेचा स्कंदपुराणात उल्लेख आहे. स्कंदपुराणानुसार पुरी तिर्थात स्नान केल्याने आणि जगन्नाथाचा रथ ओढल्यास सर्व तीर्थांचे दर्शन केल्याचे पुण्य मिळते. यामुळे जन्म-मरणाच्या फेऱ्यातून भक्तांना मुक्ती मिळते. असेही म्हटले जाते की, रथाच्या फक्त कळसाचे दर्शन केल्यानेच अनेक जन्मांचे पाप नष्ट होते.
३) सर्वात शेवटी जगन्नाथाचा रथ
रथयात्रेमध्ये सर्वात पुढे बलभद्र, सुभद्रा आणि शेवटी जगन्नाथाचा रथ असतो. बलभद्राच्या रथाला ‘पालध्वज’ म्हटले जाते. तो रथ लाल आणि हिरव्या रंगाचा असतो. सुभद्राच्या रथाला ‘दर्पदलन’ म्हणतात. सुभद्राचा रथ निळ्या रंगाचा असतो. सर्वात शेवटी असलेल्या भगवान जगन्नाथाच्या रथाला ‘गरुडध्वज’ किंवा ‘नंदीघोष’ म्हटले जाते. जगन्नाथांचा रथ लाल आणि पिवळ्या रंगाचा असतो.
भगवान जगन्नाथ मावशीच्या घरी
प्रथेनुसार भगवान जगन्नाथांचा रथ भाऊ आणि बहिणीसोबत पुरी मंदिरातून गुंडीचा मंदिरात पोहचतो. या प्रवासाला रथयात्रा म्हटले जाते. गुंडीचा मंदिर हे भगवान जगन्नाथांच्या मावशीचे घर असल्याचे मानतात. इथे जगन्नात्र आठवडाभर या ठिकाणी राहतात आणि आषाढ शुक्ल दशमीला पुन्हा पुरी मंदिराकडे प्रवास करतात. या प्रवासाला ‘बहुडा‘ यात्रा असे म्हटले जाते.
४) चारधामपैकी एक पुरीचे जगन्नाथ मंदिर
भगवान जगन्नाथांच्या मंदिराची स्थापना ११ व्या शतकात करण्यात आली होती. देशातील बद्रीनाथ, द्वारका आणि रामेश्वरम यासह पुरी येथील जगन्नाथ मंदिराचा समावेश चारधाम मध्ये होतो. जगन्नाथांचे पूर्ण मंदिर फिरण्यासाठी जवळपास १ तासाचा वेळ लागतो. आठवड्यातील सर्व दिवस सकाळी साडेपाच ते रात्री दहावाजेपर्यंत मंदिर सर्वांसाठी खुले असते. जेव्हा रथ यात्रा काढली जाते तेव्हा मंदिराला आकर्षक अशी रोषणाई केली जाते.
५) रथयात्रेबद्दलची आख्यायिका
रथयात्रेबद्दल अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. काही लोक मानतात की श्रीकृष्णाची बहिण सुभद्रा आपल्या माहेरी आली होती. तेव्हा आपल्या भावांसोबत तिने नगरात फिरण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी श्रीकृष्ण आणि बलराम हे सुभद्राला घेऊन रथातून नगरात फिरले होते. त्यानंतर रथयात्रेची परंपरा सुरु झाली. याशिवाय गुंडीचा मंदिरातील देवी श्रीकृष्णाची मावशी असून ती तिघांनाही आपल्या घरी येण्याचे निमंत्रण देते असेही लोक मानतात.
६) रथाच्या लाकडांचा लिलाव
भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथ लिंबाच्या लाकडापासून तयार केला जातो. रथयात्रा संपन्न झाल्यानंतर रथाच्या लाकडांचा लिलाव केला जातो. भाविक श्रद्धेने रथाची लाकडे खरेदी करतात. यावर्षीच्या रथयात्रेसाठी भगवान जगन्नाथांचा रथ तयार करण्यासाठी २०० कामगार काम करत होते. त्यांनी ३ महिन्यात हा रथ तयार केला.
-----------------------------------------------
संकलन ;- सतीश अलोणी @
-----------------------------------------------

No comments:
Post a Comment