----------------------------------------
श्री रंगनाथस्वामी मंदिर - भारतातील सर्वांत मोठे मंदिर
-----------------------------------------
१५५ एकर एवढ्या विस्तीर्ण भागामध्ये पसरलेल्या ह्या मंदिरामध्ये वेगवेगळी छोटी छोटी ८१ मंदिरे, २१ गोपुरे तसेच ३९ मंडप आहेत.
विष्णूचा एक अवतार असलेल्या रंगनाथ देवाचे हे मंदिर आहे. श्री रंगनाथस्वामी मंदिर हे सर्वांत वैभवाशाली वैष्णवधर्मीय मंदिरांपैकी एक आहे. वैष्णव धर्माच्या इतिहासामध्ये ह्या मंदिराला एक महत्वाचे स्थान आहे. ११व्या शतकामध्ये रामानुज आणि त्यांचे अनुयायी नाथमुनी आणि तदनंतर यमुनाचार्य ह्यांनी वैष्णव धर्म रुजविण्यामध्ये ह्या मंदिराचा मोलाचा वाटा आहे.
पुरातत्व विभागाला आढळून आलेल्या काही शिलालेखांवरून असा अंदाज बांधण्यात येतो कि हे मंदिर इ.स. पहिल्या शतकामध्ये बांधण्यात आले होते. ह्या मंदिराचा उल्लेख आपल्याला संगम काळातील (इ. स. १ ते ४थे शतक) तमिळ साहित्यामध्ये तसेच सिलापदीकारम महाकाव्यामध्ये पण आढळून येतो. चोळ, पांड्य, होयसळ आणि विजयनगर साम्राज्यांनी येथे राज्य केले आणि त्यांच्या काळामध्ये येथे शिलालेख लिहिले गेले.
१४ व्या शतकामध्ये पांड्य साम्राज्याच्या काळामध्ये ह्या मंदिरावर दिल्ली सल्तनतीने हल्ले केले आणि मंदिराची लूट करून उध्वस्त करण्यात आले होते. पण थोड्या वर्षांनी पुन्हा हे मंदिर उभारण्यात आले. १६ व्या आणि १७ व्या शतकामध्ये मंदिरामध्ये अजून बदल करून अजून काही छोटी छोटी मंदिर वाढविण्यात आली.
असे जरी असले तरी श्री रंगनाथस्वामी मंदिराचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो कारण जगातील सर्वांत मोठे मंदिर हे कंबोडिया देशातील अंगकोर वाट हे आहे. ते १६२ एकर एवढ्या परिसरामध्ये पसरलेले आहे. ही आश्चर्याची बाबच म्हणावी लागेल हिंदूंचे सगळ्यात मोठे मंदिर हे भारता बाहेर आहे
----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
------------------------------------------------

No comments:
Post a Comment