मुळ गुरुचरित्राचा गाणगापूर ते वाडी प्रवास!
गाणगापूरात भिमेच्या दक्षिण पात्रावर जेवरगी तालुक्यात हिप्परगी गाव आहे. तेथे कल्लेश्वराचे पुरातन व मोठं मंदिर आहे. श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरात प्रत्यक्ष असताना या हिप्परगा गावात भक्ताच्या घरी भिक्षेसाठी गेले होते. सर्व गाव श्रीगुरुंच्या दर्शनास लोटला. मात्र या कल्लेश्वराचा भक्त नरहरी मात्र मी माझं इमान कल्लेश्वरास विकले आहे त्यामुळे मी कशाला इतर कुणाच्या दर्शनास जाऊ म्हणत मंदिरात राहिला. नरहरी रोज कल्लेश्वरावर पद्य रचना करत असे व त्यानंतर अन्नपाणी ग्रहण करत असे. पण आज काही त्याला कवन सुचले नाही उलट त्याला मंदिरात ग्लानी आली आणि त्याला कल्लेश्वराच्या जागी श्रीगुरूंचे दर्शन झाले. तो श्रीगुरूंना शरण आला तेव्हा खुश होऊन श्रीगुरुंनी त्याला माझ्यावर रोज एक भजन, कवन करत जा असा आशिर्वाद देऊन त्यास नंदी कवी, नंदीनामा कविश्वर पदवी दिली.
श्रीगुरुंनी इस १४५८ गुरू प्रतिपदेला स्वतःचा अवतार गुप्त केला. नंदी नामा हे दरवर्षी तुळजाभवानी दर्शनास जात. तो काळ सर्व लवाजम्यासह पायी प्रवास जंगलातून असे. या परिस्थितीत प्रवासात सुरक्षा देण्यासाठी काही खाजगी व्यवस्था होती. त्यांना त्यांचा मेहनताना ठरवून दिला की प्रवासात स्री पुरुष, बैलगाड्या, जनावरे, सामान, पैसाअडका सुरक्षित राही. अनंतप्पा नायक नावाने या सेवेत पिढी परंपरेने प्रसिद्ध होता. तो कर्नाटकात हंपी म्हणजे विजयनगर ते गुजरातेतील सुरत पर्यंतच्या पट्ट्यात ते सुरक्षा व्यवस्था पुरवत.
दरवर्षी येणाऱ्या नंदी नामाच्या संबंधांमुळे अनंतप्पा श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या भक्तीत ओढले गेले व गाणगापूरला जोडले गेले. इतके की त्यांच्या परिवारातील काही सदस्य गाणगापूरला सेवेत असत. याकाळात भिषण परकिय आक्रमणे झाली. तुळजापूर पासून विध्वंस सुरू झाला. वाटेत येणारी बहुतांश मठ मंदिरे बेचिराख झाली. वाडे जाळले गेले. कत्तली झाल्या. प्रमुख मंडळी पकडून गायब करण्यात आली. गुलबर्ग्यातील राघो चैतन्य, केशव चैतन्य समाध्या, नवकोट नारायण मंदिर सर्व काही ताब्यात घेण्यात आले. मोर्चा गाणगापूरकडे वळला. अनंतप्पाने चतुराईने गाणगापूर मठाची सोय लावली. मुख्य मुख्य वस्तू इकडे तिकडे हलवल्या गेल्या. मुळ गुरू चरित्राचे ५१ पर्यंत अध्याय उघड ठेवण्यात आले. श्रीगुरुंचे गुपीत समजू नाही म्हणून पुढील अध्याय भस्माच्या गाठोड्यात लपवून ते गाठोडे संगमावरील पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत लपविण्यात आले.
परंतु दुर्दैवाने शके १५४२ म्हणजे इस १६२० मध्ये भिमेस आलेल्या महापुरात हा पिंपळ वृक्ष वाहून गेला. व त्यासोबत गुरुचरित्राची ग्रंथ संपदा देखील वाहून गेली. तथापि नंदी नामाचा मुलगा श्री भीमभट्ट यांना गोपाळ स्वामी नावाचा मुलगा झाला. ते गाव आळंद तालुक्यातील कौलगा. गोपाळ स्वामींचा विद्याभ्यास काशीत झाला. त्यांना गिरनार पर्वतावर दत्तप्रभू व गोरक्षनाथांचे आशिर्वाद प्राप्त झाले. त्यांना पुराच्या पाण्यात गुरुचरित्र वाहून गेल्याचे समजल्यावर त्यांनी सलग बारा वर्षे भिमेच्या काठावरील गावात, परिसरात शोध घेतला व हताशपणे ते नरसोबाच्या वाडीला आले. तेथे त्यांनी संततधार अनुष्ठान प्रारंभ केला. त्यांना समाधीवस्थेत श्रीगुरुंनी दर्शन देत खडसावले व तुझं अनुष्ठान आटोपते घेऊन पैठणला जा, तिथं तुझं कार्य साधेल असा आशिर्वाद दिला.
श्रीगुरू आज्ञेनुसार गोपाळ स्वामी पैठणच्या दिशेने गोदावरी काठावरुन प्रवास करत असता पांचाळेश्वर क्षेत्रात आले. पांचाळेश्वर म्हणजे दत्तात्रेयांचं माध्यान्ह भोजन स्थान. दत्तप्रभू करवीर प्रांतात म्हणजे कोल्हापूरला भिक्षा झोळी फिरवतात व भोजनास पांचाळेश्वरला येतात. हे प्राचीन तिर्थक्षेत्र आहे. जवळच राक्षस भुवन क्षेत्र आहे जिथे काठावर रामप्रभुंनी साडेसाती काळात स्थापना केलेला वालुकामय शनैश्वर आहे. या पूरातन गावात अजूनही इतिहास काळातील गढ्या आहेत. येथील विद्वान पंडितांना आजही भारतभर आमंत्रित करण्यात येते. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचं वास्तव्य इथे झालेले असल्याने येथे महानुभाव मठ आहेत.
गोपाळ शास्त्री पहाटे तीन वाजताच ते गोदावरी स्नानासाठी गेले तेव्हा नदीच्या काठावर काही अंतरावर त्यांना नदीच्या पात्रात काहीतरी धपकन टाकण्याचा आवाज आला. त्या दिशेने गेल्यावर दोन घोड्यांवर लादलेली गाठोडी गोदावरीत टाकण्याचे काम सुरू होते. गोपाळ स्वामींनी ते थांबवले. विचारपूस सुरू केली की तुम्ही हे काय करत आहात. तेव्हा अंधारातून दामोदर शास्त्री नावाचे वृद्ध समोर आले. त्यांनी त्यांची कर्मकहानी सांगितली के आता जराजर्जर झाले असून काही वर्षांपूर्वी पत्नी निर्वर्तली आहे. आता शेजारीपाजारी खायला देणे टाळत आहे. एकुलत्या एक विवाहित मुलीनं महानुभाव पंथ स्विकारला असून ती त्यांच्या मठात रहाते. त्यामुळे तीला कुणी गावात येऊ देत नाही. मी त्या मठात गेलो तर मला शेंडी व जानव्यामुळे मठात येऊ देत नाहीत. आधी काळी वस्त्रे घालून आमच्या पंथाची दीक्षा घ्यायला सांगितले व माझ्या घरातील सर्व ग्रंथसंपदा नष्ट करण्यासाठी सांगितले. पण गावातील लोक ग्रंथ नष्ट करू देत नाहीत. म्हणून मी अपरात्री ग्रंथ संपदा नदीमध्ये विसर्जित करत आहे. आज तिसरी रात्र आहे.
त्यावर गोपाळ स्वामींनी उरलेली ग्रंथ संपदा स्वतः कडे घेतली. फक्त तीन गाठोडी शिल्लक होती. ती मुक्कामाच्या ठिकाणी येऊन सविस्तर पाहिली असता त्यामध्ये मुळ पंचावन्न अध्यायाचे गुरुचरित्र मिळाले. ताबडतोब ते घेऊन गोपाळ शास्त्री वाडीकडे परत फिरले. तेथे रामचंद्र योग्यांकडे त्यांनी ते सुपुर्द केले. कालांतराने ही मुळ ओवीबद्ध अतिशय जीर्ण गुरूचरित्र शिरोळ दत्तमंदिरात गंगाधर वासुदेव मोडक यांच्या कडे आली.
गुरूचरित्राचा हा मागोवा थोर दत्तभक्त इतिहास संशोधक कडगंची जवळ आळंद येथील श्री भिमाशंकर देशपांडे यांनी घेतला आहे. त्यांनी त्यांचं आयुष्य यासाठी वाहून घेतले होते.
योगायोगाने २००० साली गुरु प्रतिपदेला त्यांची गाणगापूर मठात भेट झाली. गर्दीपासून बाजूला बसून चर्चा करताना मी श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांबद्दल एक रहस्य त्यांना हळूच बारीक आवाजात सांगितले. त्याला दुजोरा देताना त्यांनी ते रहस्य त्यांच्या तरुणपणी गाणगापूरात पाहिल्याचे सांगितले व मठामागे असलेल्या त्यांच्या वडीलोपार्जित वाड्यात मला घेऊन गेले. तेथे गुरू प्रतिपदेनिमित्ताने मोठा गोडधोडाचा स्वयंपाक सुरू होता. नैवेद्य झाल्यावर त्यांनी जवळ जेवायला बसवून घेतले. नंतर त्यांनी आतल्या खोलीत नेऊन त्यांची ग्रंथसंपदा समोर ठेवली व यातून तुला काय न्यायचे ते घेउन जा म्हणाले. त्यावेळी मोबाईल प्रचलित नव्हते. कधीमधी दुरध्वनीवर बोलणं व्हायचं. त्यांनी आळंद मुक्कामी या असं दरवेळी सांगितले. पुढं नोकरी प्रपंचाच्या व्यापात संपर्क राहिला नाही. श्रीगुरुंनी कालांतराने तु आता गाणगापूरला येऊ नये, मी तुझ्या साठी येथे नाही असे सांगितले. त्यामुळे गाणगापूर जाणं बंद होऊन फक्त कुरवपूर सुरू राहिले. तेथे दत्त जयंती २००९ ला पिठापुरला गोपाल बाबांकडे जाण्याची आज्ञा मिळाली.
वाटा बदलल्या गेल्या. पूर्वी खिशातील छोट्या डायरीत फोन, पत्ते लिहिलेले असायचे. पण हाताळून ती डायरी पानं पानं होऊन अक्षरं, लिहिलेले पुसले जायचे. काही दिवसांपूर्वी श्री भिमाशंकर देशपांडे यांचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यावर त्यांचे डॉक्टर चिरंजीव योगेश्वर भेटले व २०१८ साली वार्धक्याने वयाच्या ८७ व्या वर्षी श्री भिमाशंकर देशपांडे निर्वर्तल्याचे समजले. खूप चुटपुट लागली. ते जर आता भेटले असते तर गुलबर्ग्याचा समग्र दत्त इतिहास व सर्व ठिकाणे ज्ञात झाली असती. गुलबर्गाच का तर सतगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज, पिठापूर एकदा म्हणाले की "हुमनाबाद... गुलबर्गा बंदे नवाज", हुमनाबाद म्हणजे माणिक प्रभू माहीत आहे. मग एका जाणकाराने सांगितले की बंदे नवाज ठिकाण गुलबर्ग्यात आहे. ज्याचा संदर्भ रविदासाच्या पुढील जन्मी येतो. हे मुळचे नवकोट नारायण मंदिर आहे व येथे तुकाराम महाराजांचे गुरु केशव चैतन्य व राघो चैतन्य यांच्या समाध्या आहेत.
- हिराचंद गोपालचंद कोठारे
No comments:
Post a Comment