Friday, 14 November 2025

~: वागिश्वरी भट्टारिका :~



~: वागिश्वरी भट्टारिका :~

खरतरं वागिश्वरी म्हणजे वाक-वाणीची देवता, त्यामुळे तिची एक सौम्य प्रतिमा समोर आली असेल, पण ही तिची मूर्ती उग्र, अतिशय वेगळी आणि दुर्मीळ आहे.

सध्या कोलकाता संग्रहालयात असलेली ही मूर्ती सापडली ती नालंदा बिहारमध्ये, प्रसिद्ध पुरातत्वज्ञ डॉ.अलेक्झांडर कनिंगहमला १८६२-६३ च्या सुमारास. त्या मूर्तीवर दोन ओळींचा लेखच कोरलेला सापडला. त्या लेखात म्हटले आहे की - 'राजा गोपाल याने, त्याच्या राज्यरोहणाच्या पहिल्या वर्षीच्या नवरात्रीच्या अष्टमीला या नालंदा येथील श्री वागिश्वरी भट्टारिका देवीच्या मूर्तीला संपूर्ण सोन्याने मढवले', हा राजा गोपाल कोण या बद्दल संशोधकात मतभेद आहेत, काहींच्या मते हा पालवंशाचा राजा गोपाल (१ला) तर काहींना तो राजा गोपाल (२रा) (इसवीसन ९३५) वाटतो.

या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की ही मुर्ती जरी वागिश्वरीची म्हटली असली तरी ती तांत्रिक महाविद्या बगलामुखीच्या जवळपास जाणारी आहे. देवी ललितासनात बसली असून, सिंहावर आरूढ आहे. मूर्ती चतुर्भुजा असून, तिने वरच्या दोन्ही हातात- हातोडी आणि दंड किंवा मुसळ धारण केले आहे, आणि खालच्या दोन्ही हातात तिने धरलेल्या सांडशीच्या चिमट्याने तिने तिच्या पायाशी गुढग्यावर बसलेल्या दोन राक्षसांच्या जिभा त्यांच्या तोंडात चिमटा घालून हासडल्या आहेत! त्या राक्षसांचे हात देखील मागे बांधले आहेत असं दिसतं. 

राक्षस ज्या पद्धतीने जायबंदी झालेले दाखवले आहेत, त्या प्रकाराला तांत्रिक क्रियात- स्तंभन म्हणतात. स्तंभन म्हणजे immobilisation, जागाच्या जागी जखडून ठेवणे, या क्रियेत, शत्रूची वाचा, चालणे-फिरणे यावर बंधन आणता येतात अशी मान्यता आहे. वागिश्वरी ही खरतर वाक किंवा वाणी यांची देवता आहे,पण इथे तिला वाचा स्तंभन करणारी दाखवली आहे हे तिचे वेगळेपण!

No comments:

Post a Comment