मंगलाचरणानंतर आपली ओळख देत गुरुचरित्रकार पुढे सुरुवात करतात . सरस्वती गंगाधर म्हणतात ,हे चरित्रकथन म्हणजे माझे शब्द नाहीत जसे गुरुमहाराज अर्थात श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज प्रेरणा देतील तसे माझे लेखन आहे . या ठिकाणी सायंदेवांना मिळालेल्या वरप्रदानाचा उल्लेख येतो . पूर्वापार आमुचे वंशी l गुरु प्रसन्न अहर्निशी l --- तुझे वंशीपरंपरी l लाधती चारी पुरुषार्थ ll (१/४९-५०)
सर्वसामान्यतः स्तोत्रात किंवा ग्रंथात अगदी शेवटी याच्या पठणाने काय फळ मिळेल याचा निर्देश असतो मात्र गुरुचरित्रात सर्व अध्यायात याचा महिमा वर्णन केला आहे . या पहिल्या अध्यायात हि चरित्रकथा ज्या ठिकाणी वाचली जाईल तिथे --- श्रियायुक्त निरंतरी l नांदती पुत्र कलत्रयुक्त ll सर्वसाधारणपणे संपत्ती येताना चिंता,आजार आणि ताणतणाव घेऊन येते असा कलियुगातील अनुभव असला तरी इथे मात्र सरस्वती गंगाधर म्हणतात ,रोग नाहीत तया भुवनी l सदा संतुष्ट गुरुकृपेनी ll
दत्त कृपेचे हे काही अद्भुत नियम आहेत --- विनियोगापुरती संपत्ती येईल पण त्याविषयी हव्यास नसेल ,आरोग्य मिळेल पण त्याचा वापर दत्त सेवेखेरीज होणार नाही ,पुढील पिढ्या असतील आणि त्या सर्व दत्त कृपेने सेवेत असतील अर्थात वाममार्गाला जाणार नाहीत .
दत्त भक्तीचे हे गुह्य ज्याने दत्त महाराजांवर श्रद्धा ठेवली त्याला अवश्य कळते . गुरुस्मरण असे भले l अनुभवा हो सकळिक ll (१/५९) अनुभव हे नित्य काही ना काही किंमत मोजून शिकावे लागतात असे वचन जरी असले तरी हा दत्त कृपेचा अनुभव मात्र मोफत आहे बरं का !!
पण मग नामधारकांना काय अनुभव होता यावर ते म्हणतात ,तृप्ती झालिया ढेकर l देती जैसे जेवणार l जेवल्यावर येणारी ढेकर हि त्या पदार्थांच्या रसास्वादाची असते ,क्षुधाशांतीच्या तृप्तीची असते त्या प्रमाणे गुरुमहिमेचा उदगार l बोलतसे अनुभवोनी ll या गुरुकृपेची गोडी मी चाखलेली आहे तेव्हा हे बोल अनुभवाचे आहेत .
एकेका अध्यायाचे स्मरण ,चिंतन करताना मनोराज्ये मागे हटतात ,त्या काळात आपण अलगद जाऊन पोहोचतो आणि त्या अध्यायातील सर्व लीला समोर घडताना पाहून धन्य होतो . श्री गुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य
No comments:
Post a Comment