एक योगी रूपातील महापुरुष!
---------------------------------------
---------------------------------------
श्री परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांचे अफाट त्याग कार्य व सेवा कार्य आपण सर्व जाणतोच. तशीच त्यांची श्री दत्तत्रेयांप्रती असलेली श्रद्धा, वात्सल्य, दृढ़ता आणि अपार विश्वास हा सर्वश्रुत आहे. या विराट त्यागाच्या कणांची उर्जा आपल्या सारख्या दत्त प्रेमीं साठी साक्षात ब्रम्हचैतन्य प्रदान करणारी आहे.
अशा या पुण्यवंत तपोयोगींनी त्यागाचा ही महात्याग केला आणि भक्तीचे परमोच्च शिखर गाठून या महात्यागाचा ही परमत्याग केला!
तर ह्याच एकमेव त्याग भावनेने श्रींनी दत्त साधनेची उत्तमोत्तम अशी उदाहरणे भक्तगणां समोर मांडली.
ती मांडत असताना त्यांच्या सुमुखावर कधीही असंतोषाचा, द्वेषभावनेचा,मत्सराचा भाव नसे.
त्यांच्या त्या दत्त तत्वांनी प्रज्वलित अशा मनात केवळ ममत्वच होते. रंजलेल्या गांजलेल्या साधकाच्या, रोगाने लालबुंद झालेल्या कुष्ठ शरिरास श्रींनी आपल्या थरथरत्या हातांनीच आधार दिला. या आधारात, अनाथांचा करुणामय असा दिनानाथ दडलेला होता. हे करत असताना त्यांचे डोळे जरीही कोरडे भासत असले तरी सुद्धा त्या नयनातून क्षुद्र कटाक्ष क्षेप न पडता केवळ दयावंत अशी पाणीदार नजर वात्सल्य भावनेने ओसंडून वाहात असे.
कोणीही कितीही अपमानास्पद बोलले तरी सुद्धा आपल्या ओठांवरचे दत्त नाम आणि त्याच सुकलेल्या ओठांवरचे स्मिथ हास्य कधीही अलिप्त झाले नाही.
ईतकी नम्रता कशी बरं असावी?
आपल्या लाडक्या दत्तमुर्तीस देखील आपल्यापासून दूर केले गेले तरीही कोणतीही तक्रार न करता, त्याच गंगाघाटा वर , गंगेच्या झुळझुळीकडे अगदी चातकासारखे डोळे लावून बसले.
ईतकी सबुरी कशी बर असावी?
पायाला खडावांचा मोह होईल म्हणून त्यांनी उभ्या जन्मात त्या भेगा पडलेल्या, फोड आलेल्या, लालबुंद झालेल्या पायांना लाकडी पादूकांचा स्पर्श होऊ दिला नाही. शेवटच्या क्षणी साधकांनी श्रींकडे चरण पादुकांचा हट्ट केला तेव्हा देखील नर्मदेच्या एका गोट्यावर तीन प्रहर, भास्कर किरणांचे चटके भेदरलेल्या केसांच्या डोक्यावर सहन करत उभे राहिले. त्यांचे हे रूप पाहून नर्मदाच काय तर तो पाया खालचा गोटा देखील गहिवरून गेला.
ईतकी सहनशीलता कुठुन बरं आली असेल?
अहो... त्यांच्या तळहातावर दंड पकडून पार काळानिळा असा डाग पडला ; तरीसुद्धा त्यांनी दत्तमुर्तीस लागणारे चंदन उजळताना कधीही , हातास होणाऱ्या वेदना दर्शविल्या नाहीत. ह्या उलट तो तळहात त्यांनी रोगी मनुष्याच्या पाया खाली देखील स्पर्श करताना किंवा ठेवताना मागे पुढे पाहिले नाही.
ईतका निस्वार्थपणा कसा आला असेल?
आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी एका करत्या पुरुषाच्या शास्वत अशा भूमिकेत राहून आपल्या आईची आणि आपल्या धाकट्या भावंडांची आत्मीयतेने सेवा आणि काळजी घेतली.
खरतर त्यांच्या मना विरुद्ध जाऊन त्यांना संसार बंधनात अडकविले गेले, पण ह्या सगळ्याचा दोष त्यांनी आपल्या पत्नीला कधीही दिला नाही, याऊलट शेवटच्या दिवसात तिच्या आजारपणात तिची मनोभावे सेवा केली . पदरी, कुस तृप्त करणारं नवजात बाळ डोळ्या देखत गेलं. ह्या धक्याततून सावरणार तेवढ्यातच त्यांची अर्धभार्या त्यांची अर्धायुष्याची साथ सोडून गेली.
पण ह्या एवढ्या सगळ्या चढ उतारातून, संकटातून, त्यागातून, मनस्तापातून त्यांचे दत्तनामात रंगलेले चित्त, टाळमृदुंगाने तृप्त भरलेले कर्ण, दत्त दर्शनासाठी आसुसलेले कोरडे डोळे, दत्तनाम घेणारे सुकलेले ओठ, आणि दत्त तत्वात विलीन झालेला शरीरातिल प्रत्येक सुक्ष्म अंश दिवसेंदिवस अधिकाधिक जाज्वल्य होत गेला.
त्यामुळेच एक सर्व साधारण मनुष्याच्या कलेने पाहता, श्रींच्या अनेक मानवी छटा होत्या.
एक आदर्श पुत्र, एक आदर्श पती, एक आदर्श बंधू, एक आदर्श दत्तसाधक आणि एक सर्वोच्च परम आदर्श प्रदान करणारा थोर सत्पुरुष व सद्गुरु ..!!
त्यामुळेच अगदी नास्तिकांनी देखील श्रींकडे एका साधकाच्या रुपातून न पाहता सर्वसामान्य माणूस म्हणून पाहिले तर त्यांना देखील, श्रींमध्ये एक अत्यंत कर्तव्यदक्ष मानवी रूपातील सत्पुरुष दिसेल..!! कोणिही अशा महापचरुषाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला काय हरकत आहे?
----------------------------------------
सुनंदन कृष्णराव राऊळ
मुंबई गोरेगाव
२२/०५/२०२०
----------------------------------------
सुचना:-
कृपया आपण शेअर करतांना नाव न बदलता याच नांवाने शेअर करणे🙏🏻💐
__________
No comments:
Post a Comment