---------------------------------------
ज्येष्ठ पौर्णिमा..!
अर्थातच वटसावित्री पौर्णिमा
----------–-------------------------------
वटवृक्ष हा शिवरूपी आहे.
शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्वराची पुजा केली जाते; कारण कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जीवाला फायदा होतो.
अशा प्रकारे वटवृक्षाची पुजा करण्यामागे सती सावित्रीच्या कथेचा पौराणिक संबंध तर आहेच,
तसेच ...
वृक्षांना देव मानून वृक्षपूजा करण्याचा आणि त्या वृक्षपूजनेतून वृक्षांप्रति ऋण व्यक्त करण्याचा संस्कार देणा-या भारतीय संस्कृतीचा हा उल्लेखनीय सण सुध्दा आहे!
हे वटसावित्री पौर्णिमेचे व्रत, सुवासिनी आपल्या पतीला व स्वतःला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात!
------------------------------------------
वटसावित्री पौराणिक कथा
-----------–----------------------------
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली.
सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. महर्षि नारदमुनींना मात्र सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.
पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन सत्यवानासोबत आपल्या सासू सास-यांची सेवा करू लागली.
अखेर वर्षपूर्ती झाल्यावर सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला.
यमधर्म तिथे आपल्या यमदूतांसह आले व सत्यवानाचे प्राण नेऊ लागले. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला.
अखेर कंटाळून यमाने तिला सांगितले की,
"हे सावित्री! पतीचे प्राण परत मागणे सोडून तू इतर कोणतेही तीन वर माग!"
यावर कोणते तीन वर मागावेत की, जेणेकरुन आपल्या पतीचेही प्राण परत मिळतील आणि सासू-सास-यांचेही भले होईल याबाबत सावित्रीने क्षणभर विचार केला..
आणि ती यमराजांना म्हणाली,
"हे यमदेवा!
मला माझ्या पतीच्या प्राणांहुन दुसरे काहीही प्रिय नाही! आणि आपण नेमके तेच सोडून इतर तीन वर मागण्याचा आग्रह धरीत आहात! ठिक आहे! माझ्या नशिबात असेल ते घडेल! मी आता आपल्या आज्ञेप्रमाणे तीन वरदान मागत आहे! कृपया अनुग्रह व्हावा! पहिल्या वरदानाने माझ्या सासू-सास-याचे डोळे ठिक व्हावेत, दुस-या वरदानाने त्यांचे गेलेले राज्य परत मिळावे व तिस-या वरदानाने मला मातृसुख मिळण्यासाठी पुत्रप्राप्ती व्हावी अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे!"
यमराजांनी प्रसन्नतेने सावित्रीला "तथास्तु!" म्हटले तेंव्हा आपण शब्दांमध्ये वचनबध्द झाल्याची यमराजांना जाणीव झाली व त्यांना सत्यवानाचे प्राण परत करावे लागले!
सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रताचे आचरण करतात.
या वटसावित्री पौर्णिमेच्या पुजाविधीत, सती सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान-सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत.
----------------------------------------
व्रताची सोपी पूजा विधी
-----------------------------------------
भारतीय संस्कृतीमध्ये वट सावित्री पौर्णिमा व्रत आदर्श स्त्रीत्वाचे प्रतीक बनले आहेत. वट पूजेशी निगडित धार्मिक, वैज्ञानिक आणि व्यावहारिक बाबींमध्ये वट आणि सावित्री दोघांचे महत्त्व आहेत. पौर्णिमेला साजरे केले जाणारे हे व्रत कैवल्य सौभाग्य आणि अपत्य प्राप्तीमध्ये साहाय्य करणारे आहेत. सुख भरभराटी आणि अखंड सौभाग्याचं लेणं देणाऱ्या या वट सावित्री पौर्णिमा हे व्रत केले जाते
जाणून घेऊ या व्रताचीसोपी पूजा विधी
पूजा साहित्य:-
हिरव्या बांगड्या, शेंदूर, एक गळसरी (काळी पोत), अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहू, सती मातेचा फोटो किंवा सुपारी इ.
पूजन विधी:-
प्रथम सौभाग्यवती स्त्रीने
‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’,
असा संकल्प करावा.
स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा.
प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी.
गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी.
नंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे.
हळदी-कुंकू, काली पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे.
वडाचे मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी.
वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.
वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्या.
हे मंत्र म्हणावे-
” सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।
तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।
अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।
अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।”
५ सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी.
सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे.
या प्रकारे प्रार्थना करावी -
`मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’.
अशी प्रार्थना करावी.
----------------------------------------------
वट वृक्षाबद्दलची वैशिष्ट्ये
-----------------------------------------------
* पुराणात असे स्पष्ट केले आहे की वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं वास्तव्य आहे.
* वट पूजेशी निगडित धार्मिक, वैज्ञानिक आणि व्यावहारिक पैलू आहेत.
* वटवृक्ष ज्ञान आणि सृष्टीचे प्रतीक आहे.
* भगवान बुद्धांना याच वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली होती.
* वट वृक्ष हे मोठे असून पर्यावरणच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत, कारण या झाडावर अनेक प्राणी आणि पक्ष्यांचे जीवन अवलंबून असतं.
* हे वातावरणाला शुद्ध करून मानवाच्या गरजपूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.
* तत्त्व ज्ञानाच्या दृष्टिकोनातून वट वृक्ष दीर्घायुष्य आणि अमरत्वाचे प्रतीक म्हणून स्वीकारले जाते.
* वट सावित्री व्रतामध्ये बायका वट म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करतात.
* वडाच्या झाडाच्या खाली पूजा करून कथा ऐकल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
* वडाची पूजा आणि सत्यवान सावित्रीच्या कथेचे स्मरण करून देण्यासाठी हे व्रत वट सावित्री या नावाने प्रख्यात आहे.
* धार्मिक मान्यतेनुसार वडाची पूजा दीर्घायुष्य, सुख- समृद्धी आणि अखंड सौभाग्याचे लेणं देण्यासह सर्व प्रकारचे कष्ट आणि दुःखाचा नाश करणारी आहेत.
* प्राचीन काळात मनुष्य इंधन आणि आपल्या आर्थिक गरजापूर्ण करण्यासाठी लाकडांवर अवलंबून असे. पण पावसाळा झाडे बहरण्यासाठी, वाढण्यासाठी महत्त्वाचा असतो. त्याचसोबत अनेक प्रकारांचे विषारी प्राणी अरण्यात वावरत असतात. म्हणूनच मानव जीवनाच्या संरक्षणासाठी आणि पावसाळ्यात झाडे झुडुपं तोडण्यापासून वाचविण्यासाठी अशे व्रत कैवल्य धर्माशी जोडून दिले आहेत. जेणे करून झाडे झुडुपं बहरत राहो आणि त्यांच्यापासून आपल्या सर्व गरजा दीर्घकाळापर्यंत पूर्ण होत राहो.
भारतीय संस्कृतीमध्ये वट सावित्री पौर्णिमा व्रत आदर्श स्त्रीत्वाचे प्रतीक बनले आहेत. वट पूजेशी निगडित धार्मिक, वैज्ञानिक आणि व्यावहारिक बाबींमध्ये वट आणि सावित्री दोघांचे महत्त्व आहेत. पौर्णिमेला साजरे केले जाणारे हे व्रत कैवल्य सौभाग्य आणि अपत्य प्राप्तीमध्ये साहाय्य करणारे आहेत. सुख भरभराटी आणि अखंड सौभाग्याचं लेणं देणाऱ्या या वट वृक्षाबद्दलची वैशिष्ट्ये
या व्रत कैवल्याची वैज्ञानिक आणि व्यावहारिक गोष्ट बघितल्यावर या व्रत कैवल्याची सार्थकता दिसून येते.
-----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
-----------------------------------------------
No comments:
Post a Comment